अनुकरण नको नवनिर्मिती करा
By admin | Published: December 13, 2015 12:45 AM2015-12-13T00:45:14+5:302015-12-13T01:13:19+5:30
अनिल नाईक : युवा चित्र शिल्प अभियान
कणकवली : चित्रकार-शिल्पकाराने माध्यमांचा यथायोग्य अभ्यास करावा. त्याचा उपयोग आपल्या नवनिर्मितीसाठी करावा. माध्यमातील तज्ज्ञ होणे हे एका अर्थाने गुलाम होण्यासारखे आहे. त्यापेक्षा नवे प्रयोग करून नवनिर्मिती करा. त्यातच कलाकाराचे सार्थक आहे, असे प्रतिपादन जे. जे. स्कूल आॅफ आर्टस्चे प्रा. अनिल नाईक यांनी केले. अखंड लोकमंच सिंधुदुर्ग आयोजित अखिल भारतीय युवा चित्र शिल्प अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते व्ही. के. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी रहेजा कॉलेज आॅफ आर्टस्चे प्रा. सुरेंद्र जगताप, गोवा येथील चित्रकार राजेंद्र उसपकर, अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश कुऱ्हाडे, बाळा कदम, सुजित काणेकर, फारूख शेख, विनायक सापळे, प्रदीप मांजरेकर, शैला कदम, विनायक हरकुळकर उपस्थित होते.
अनिल नाईक पुढे म्हणाले की, युवा कलाकारांना योग्य दिशा मिळाली नाही तर ते भरकटतात. निर्मिती ऐवजी ते अनुकरण करत राहतात. माध्यमांचे मास्टर होतात. शास्त्र उच्च पातळीवर गेले की कलेची निर्मिती होते. कारागिरी उत्तुंग स्तरावर गेली की कला जन्म घेते. ही प्रक्रिया श्वासोच्छवासासारखी हवी. एक माध्यम सोडले की दुसरे शिकता येते. कोणत्याही शैलीचा अभ्यास करणे योग्य आहे. मात्र, त्या शैलीचे गुलाम होऊ नका. कलेच्या बाबतीत कोणत्याही प्रथांचे अनुकरण नको. चित्रकार म्हणून समज येणे आवश्यक आहे. जे काम कराल ते अर्थपूर्ण हवे. निसर्गही कधी पुनरावृत्ती करत नाही. त्यामुळे चित्रकाराने तसे करू नये. प्रत्येक बाबतीत नाविन्य शोधावे. कार्यशाळेतून वैचारिक आदानप्रदान व्हावे. यावेळी नामानंद मोडक यांनी अभियानाची प्रस्तावना केली. पहिल्या टप्प्यात ७ हजार विद्यार्थ्यांनी चित्रे रेखाटली. ही स्पर्धा नसून तो एक प्रोत्साहनाचा भाग होता. त्याचा पुढील टप्पा म्हणून ही युवा चित्र-शिल्प कार्यशाळा घेण्यात येत आहे. त्यानंतर संमेलनाकडे वाटचाल केली जाणार आहे. (प्रतिनिधी)