आपल्याला दिलेला त्रास इतरांना नको
By Admin | Published: July 20, 2016 11:22 PM2016-07-20T23:22:06+5:302016-07-21T00:55:01+5:30
प्रफुल्ल सुद्रीक : कार्यकाल संपल्याने व्यक्त केल्या भावना ; विनोद जाधव यांची नियुक्ती
कुडाळ : जिल्हा युवक राष्ट्रवादी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदावरील तीन वर्षांच्या कालावधीत पक्षसंघटना बांधणी व वाढीसाठी तसेच पक्षाचे ध्येय, विचार तळागाळात पोचविण्याचे काम केल्याने समाधानी आहे. काहींनी या कालावधीत खूप त्रास दिला, तो पुढील पदावरील व्यक्तीला देऊ नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादी युवक संघटनेचे मावळते जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी व्यक्त केली.
जिल्हा युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्याने प्रफुल्ल सुद्रीक यांनी आपल्या भावना प्रसिद्धीपत्रकांतून व्यक्त केल्या. या पदावर पक्षाने कुडाळ तालुक्यातील माणगावातील विनोद जाधव या युवा कार्यकर्त्याला संधी दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारून माझे वडील सुरेश सुद्रीक यांच्यापासून मी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. तीन वर्षांपूर्वी माझ्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील व आताचे युवक प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आपल्याला सिंधुदुर्ग युवक राष्ट्रवादी संघटनेचा जिल्हाध्यक्ष केले. या जबाबदारीने आपल्यातील अनेक पैलू जागे होऊन तळागाळातील कार्यकर्त्यांशी आपली नाळ जुळली. यामुळे आपण आपल्या कारभारावर समाधानी आहोत. खरे तर या संघटनेचे युवक जिल्हाध्यक्षपद हे दीड वर्षासाठी असते. मात्र, आपला दीड वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर या पदी पक्षाच्या नेत्यांनी माझीच निवड केली हा माझा वरिष्ठांनी केलेला गौरवच आहे.
युवक प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आपणास या पदाबाबत विचारले होते, पण आपण त्यांना नकार दिला होता. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींत राष्ट्रवादीला सत्ता मिळवून देण्यास आपण कटीबद्ध असल्याचे सांगत आपणावर टाकलेली कोणतीही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार
पाडण्याचे आश्वासनही त्यांनी
दिले. (प्रतिनिधी)
आता तरी त्रास द्यायचा सोडा
पदासह खुर्चीसाठी लाचार न होता, तळागाळातील कार्यकर्त्यांची कामे केल्यानेच जिल्हाध्यक्षाची जबाबदारी आपल्यावर टाकण्यात आली. पण पदाच्या हव्यासापोटी एका ने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला खरा पण तो यशस्वी झाला नाही. माझी फेरनिवड करण्यात आली. नुतन जिल्हाध्यक्षांना असा त्रास न देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.