भूमिगत वीज वाहीन्याच्या उद्देशाला हरताळ फासू नका : संदेश पारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 03:19 PM2019-05-15T15:19:40+5:302019-05-15T15:21:37+5:30
कणकवली शहरातील भूमिगत विज वाहिनीचे काम सुरू करण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घ्या. त्या योजनेच्या उद्देशाला हरताळ फासू नका. अन्यथा काम रोखण्यात येईल . असा इशारा कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला.
कणकवली : कणकवली तालुक्यातील विज वितरणच्या समस्यांवरून कार्यकारी अभियंता संजय गवळी यांना संदेश पारकर यांनी मंगळवारी जाब विचारला. तालुक्यातील रिक्त पदे, कमी दाबाने विज पुरवठा, शेती पंप वीज जोडणी , शहरातील भूमिगत विज वाहिनी योजना याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी कणकवली शहरातील भूमिगत विज वाहिनीचे काम सुरू करण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घ्या. त्या योजनेच्या उद्देशाला हरताळ फासू नका. अन्यथा काम रोखण्यात येईल . असा इशारा कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला. यावेळी संजय गवळी यांनी ३१ मे पूर्वी विज प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन दिले.
येथील विभागीय विज वितरण कार्यालयात मंगळवारी कणकवली तालुक्यातील विजेच्या समस्यांबाबत भाजपाच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता संजय गवळी यांची भेट घेतली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संदेश सावन्त -पटेल, महेश सावंत, प्रसाद अंधारी, बिडवाडी सरपंच सुदाम तेली, कळसुली सरपंच साक्षी परब, सुरेश बावकर, आशिष काळिंगण, जे़. जे.दळवी, रणजित सुतार, मधुकर चव्हाण यासह तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते़
कणकवली शहरात होत असलेल्या भूमिगत विज वाहीनीच्या प्रकल्पात नागरिकांना विश्वासात घ्या. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी जे खांब वाहतुकीस अडथळे ठरत आहेत. त्या ठिकाणी भूमिगत वीज वाहीनीचे काम झाले पाहिजे. कणकवली मुख्य बाजारपेठ, तेली आळी व अन्य भागांमध्ये चर्चा करूनच हा निर्णय घेतला पाहिजे.
आठ किलोमिटरचे काम पुर्ण करायचे म्हणून काम करू नका. सर्व्हे करूनच भूमिगत वीज वाहीनीचे काम करा. मोकळी जागा मिळेल त्या ठिकाणी काम पुर्ण करून निधी खर्च घालू नका. अन्यथा चुकीच्या कामास आमचा विरोध असेल, असा इशारा संजय गवळी यांना संदेश पारकर यांनी दिला.
यावेळी कणकवली शहरातील नव्या १६ ट्रान्सफार्मरबाबत चर्चा झाली. हे ट्रान्सफार्मर कुठे बसवणार? याची विचारणा संदेश पारकर यांनी अधिकाऱ्यांना केली़ त्यावर अंधारी राईस मिल, बांधकरवाडी, दत्तमंदिर, सोनगेवाडी, रेल्वेस्टेशन हे ट्रान्सफार्मर लवकरच चालू करण्यात येतील. साईनगर वरचीवाडी, मधलीवाडी, मच्छिमार्केट, विद्यामंदिर, तहसिल कार्यालय, तेलीआळी या ट्रान्सफार्मरबाबत जून अखेरपर्यंत काम केले जाणार आहे. लवकरात लवकर दर्जेदार काम करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील, असे संजय गवळी यांनी सांगितले.
कळसुली गावात स्ट्रीटलाईटसाठी पैसे भरूनही पन्नास ठिकाणी बल्ब लावण्याचे काम अद्यापही करण्यात आलेले नाही. कळसुली गावात एकही वायरमन नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. जर कामे करायची नसतील तर आमचे पैसे भरून का घेतलात? अशी विचारणा कळसुली सरपंच साक्षी परब यांनी केली. त्यावर येत्या दोन दिवसात स्ट्रीट लाईटचे काम पुर्ण करू. तसेच येत्या आठ दिवसात वायरमनची व्यवस्था कळसुली गावासाठी केली जाईल, असे आश्वासन गवळी यांनी दिले.
तसेच कासरल धनगरवाडी येथे कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याची सूचना संदेश सावंत- पटेल यांनी मांडली. त्या संदर्भात दुरूस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना गवळी यांनी दिले.
तालुक्यात शेतीपंप प्रकरणे करून चार-चार वर्षे उलटली तरी अद्यापही वीज जोडणी का दिली जात नाही. अशी विचारणा पारकर यांनी केली असता हा जिल्ह्याचाच गंभीर प्रश्न असल्याचे गवळी यांनी सांगितले. जिल्ह्यात ६०० शेती पंप वीज जोडणी प्रकरणे पेंडींग आहेत. बारा वेळा निविदा प्रक्रीया करूनदेखील प्रतिसाद लाभलेला नाही. यावेळी आक्रमक भूमिका घेत शेतकºयांनी करायचे काय? अशी विचारणा अधिकाºयांना करण्यात आली. त्यावर गवळी यांनी सध्या सौरउर्जेवर चालनाऱ्या पंपाची जोडणी केली जात आहे. असे सांगत नव्याने तसे प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या.
बिडवाडी गावातील लाडवाडी, डोंगरवाडी यासह अनेक वाड्यांमध्ये कमी दाबाचा विद्युत पुरवठा व गंजलेले खांब असल्याने धोका निर्माण झाला आहे़. त्यावर कार्यवाही केव्हा करणार? अशी विचारणा सरपंच सुदाम तेली यांनी केली. तसेच वरवडे गावातील काही समस्यांबाबत सोनू सावंत, सुरेश सावंत यांनी लक्ष वेधले.
भरणी गावातील १२ विजेचे खांब गंजलेले आहेत. कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. यासह तालुक्यातील नरडवे, कलमठ, फोंडाघाट व अन्य गावातील वीज प्रश्न नागरिकांनी मांडले. तेव्हा संदेश पारकर यांनी वीज वितरण विरोधात जनतेच्या मनात संतापाची भावना आहे. केवळ एकाच अधिकाऱ्यांवर सर्व काम न सोपवता येत्या पंधरा दिवसात तालुक्यातील सर्व विज प्रश्न मार्गी लावा, अन्यथा १ जून रोजी पुन्हा आवाज उठविला जाईल, असा इशारा दिला.