सहनशीलतेचा अंत पाहू नका

By admin | Published: August 9, 2016 10:54 PM2016-08-09T22:54:16+5:302016-08-09T23:52:03+5:30

नीतेश राणे यांनी सुनावले बोल : कणकवलीत बैठक; एस. टी. वाहतुकीच्या समस्या

Do not see the end of endurance | सहनशीलतेचा अंत पाहू नका

सहनशीलतेचा अंत पाहू नका

Next

कणकवली : सिंधुदुर्गातील एसटी व बांधकाम विभागातील वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांत समन्वय नसल्यामळेच सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये तत्काळ बदल करा. सर्वसामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत आता पाहू नका, अशा शब्दात अधिकाऱ्यांना खडे बोल आमदार नीतेश राणे यांनी आज सुनावले. यावेळी जिल्ह्यातील दुर्गम भागासाठी मिडी बस उपलब्ध करण्याबरोबरच वैभववाडी, फोंडा, कणकवली बसस्थानकांच्या प्रश्नांबाबत परिवहनमंत्र्यांची भेट घेऊन ते प्रश्न मार्गी लावू, असेही त्यांनी येथे जाहीर केले.
एस टी. वाहतुकीबाबत स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी बैठक घेतली. यावेळी एस.टी.विभाग नियंत्रक चेतन हसबनीस, विभागीय वाहतूक अधिकारी सागर पळसुले, कणकवली आगार व्यवस्थापक प्रमोद यादव, अशोक राणे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर, उपअभियंता मनोहर पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष
सुरेश सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, सुरेश ढवळ, विभावरी खोत, रत्नप्रभा वळंजू, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती महेश गुरव, बाबासाहेब वर्देकर, भाग्यलक्ष्मी साटम, आनंद ठाकूर, रमाकांत राऊत, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे,
नासीर काझी, बंड्या मांजरेकर उपस्थित होते.
यावेळी एस. टी.सेवेबाबत विविध समस्या मांडण्यात आल्या. अयोग्य वेळेत सुटणाऱ्या एस.टी. फेऱ्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गैरसोयीकडे लक्ष वेधण्यात आले. खारेपाटण बसस्थानकावरील स्टॉलधारकांना प्रशासनाने हटविण्याचे ठरविले आहे. तेथील स्थिती गणेश चतुर्थीपर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याची सूचना आमदार राणे यांनी केली.
गणेशोत्सवाच्या कालावधीत फोंडा तसेच कणकवली बस स्थानकातील सोयींचा बोजवारा उडत असतो. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधले, तर याबाबत आमदारांनी जाब विचारताच कणकवली डेपो नूतनीकरणासाठी ७१ लाखांचा प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयाकडे सहा महिन्यांपूर्वी पाठविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रस्तावाचा पाठपुरावा करून तो लवकरच मंजूर करून आणण्याचे आमदार राणे यांनी आश्वासन
दिले. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे येणारे पर्यटक आणि स्थानिकांचाही विचार करून प्रस्ताव मंजूर होईपर्यंत आवश्यक स्वच्छता आणि
सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असे आमदार राणे यांनी सांगितले.
मानव विकास संसाधन प्रकल्प फक्त वैभववाडी तालुक्यासाठी मंजूर असून याअंतर्गत असलेल्या बसेस अन्य कारणासाठी न वापरण्याची भालचंद्र साठे यांनी मागणी केली. खारेपाटण-वैभववाडी बस दिगशीमार्गे सोडण्याचे आमसभेत गतवर्षी आश्वासन देऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. याकडेही लक्ष वेधण्यात आले. या मार्गावर बसफेरी सोडण्याची नासीर काझी यांनी मागणी केली, तर नरडवे मार्गावर शटल सर्व्हिस सुरू करण्याची बाबासाहेब वर्देकर यांनी मागणी केली. फोंडा ते कनेडी मार्गे हरकुळ या मार्गाची १५ मे पूर्वी दुरुस्ती करण्याचे आश्वासन देऊनही पूर्तता झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, तर चतुर्थीपूर्वी खड्डे बुजविण्याची मागणी केली.
रस्त्यावरील खड्ड्यांबाबत आमदार राणे यांनी कार्यकारी अभियंता व्हटकर यांना धारेवर धरले. खड्डे मातीने भरून केवळ मलमपट्टी केली जात आहे.
महामार्गावरील खड्डे पेव्हर ब्लॉकने भरल्यामुळे अपघाताला निमंत्रण देत असल्याचा आरोप आमदार राणे यांनी केला. रस्त्यांवरील खड्डे बुजवताना रोलरचा वापर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. ग्रामस्थांच्या समस्यांना बेजबाबदारपणे उत्तरे देणाऱ्या बांधकामच्या अधिकाऱ्यांना आमदार राणे यांनीे यावेळी खडे बोल सुनावले. भरणीसाठी जादा गाडी सोडा, आशिये येथे मिडी बसची सोय उपलब्ध करून द्या. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. (वार्ताहर)

बस थांब्याची गरजच काय ?
‘हात दाखवा आणि एस. टी. थांबवा’ या प्रशासकीय धोरणाला कर्मचाऱ्यांकडूनच हरताळ फासला जातोय असे नासीर काझी यांनी सांगितले. तसेच प्रवाशांनी हात दाखविल्यावर एस. टी. थांबवायची असल्याने बस थांब्याची गरजच काय? असाही प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. वाहकांना तशा सूचना देण्यात येतील, असे विभाग नियंत्रकांनी सांगितले.
आढावा बैठक घेणार !
दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेऊन समस्या सुटल्या का? हे पाहणार आहे. तसेच बांधकाम विभागाची स्वतंत्र बैठकही घेणार असल्याचे आमदार राणे यांनी यावेळी जाहीर केले.

Web Title: Do not see the end of endurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.