विकासाची चर्चा नको, कृती करा
By admin | Published: January 29, 2016 11:23 PM2016-01-29T23:23:06+5:302016-01-29T23:58:48+5:30
नारायण राणे : भूमिपूजनाच्या व्यासपीठावरच वाचला कोकणातील समस्यांचा पाढा
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्गात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या समस्या आहेत. शाळांमध्ये शिक्षक नाहीत. रस्ते खराब झाले आहेत. मुख्यमंत्री येतात आणि पैसे न देता निघून जातात. कोकण विकासाची केवळ चर्चा नको, ठोस कृती करा, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आज शुक्रवारी निवळी येथे झाले. या कार्यक्रमात राणे यांनी कोकणातील समस्यांचा पाढा वाचला आणि केवळ घाईघाईत दौरा न करता कृती करण्याचा सल्लाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. पुढील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आपले भाषण आटोपून निघून गेले. त्यांच्या उपस्थितीत आपल्याला कोकण विकासाचे मुद्दे मांडायचे होते. मात्र, ते निघून गेले आहेत. तरीही आपण या व्यथा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकण रेल्वेइतकेच महत्त्व मुंबई-गोवा महामार्गाला आहे. हे महत्त्व ओळखून महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात गडकरी यांनी जो पुढाकार घेतला आहे, त्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत, अशा शब्दात राणे यांनी भाषणाला सुरूवात केली आणि पुढच्या भाषणात त्यांनी राज्य सरकारला ठोकून काढले.
महामार्गाबाबत राज्य सरकारकडून पूर्ण माहिती दिली जात नाही. मोबदला नेमका किती मिळणार, नेमकी किती जागा संपादीत केली जाणार, याचा खुलासा व्हायला हवा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात कोकण विकासाचे अनेक मुद्दे सांगितले. पण त्यांनी कधी जिल्हाधिकारी यांच्याकडे माहिती घेतली आहे का? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसलाच निधी येत नाही. आरोग्य केंद्रांच्या समस्या कायम आहेत. शाळांमध्ये शिक्षक नाहीत. ग्रामीण भागांना जोडणारे रस्ते गेला बराच काळ नादुरूस्त आहेत. कोणत्याही कामासाठी निधीच मिळत नाही. मग विकास कसला होतोय, असा प्रश्न राणे यांनी केला.
मुख्यमंत्री दरवेळी घाईघाईत येतात, आश्वासने देतात, घोषणा करतात आणि पैसे न देताच निघून जातात, असा टोला त्यांनी हाणला.
आपल्याला कोकणाचा विकास हवा आहे. त्यामुळे आपण विकासात कधीही राजकारण आणणार नाही. कोणत्याही विकासात्मक कामाला आपले सहकार्यच असेल. मात्र, केवळ चर्चाच न होता, ठोस कृती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चौपदरीकरणासाठी घेतल्या जाणाऱ्या जागेसाठी दर किती देणार, याचा खुलासाही अजूनपर्यंत झालेला नाही. प्रत्येक माणसाची नेमकी किती जागा घेतली जाणार, त्याला दर नेमका किती मिळणार याची स्पष्ट माहिती जिल्हाधिकारी यांच्याकरवी लोकांपर्यंत गेली तर भूसंपादनाच्या कामात कोणाचाही विरोध राहणार नाही, असे ते म्हणाले.
चौपदरीकरण झाल्यानंतर त्याचा वापर कोकणवासीय केवळ प्रवासासाठी करणार नाहीत. व्यापारासाठी, विकासासाठी, पर्यटनवाढीसाठी त्याचा उपयोग केला जाईल, असे आश्वासन त्यांनी गडकरी यांना दिले. या कामाला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी गडकरी यांचे आवर्जून आभारही मानले.
राणे यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी होती. त्यात राणे यांनी मुख्यमंत्री पर्यायाने राज्य सरकारवर टीका करून कार्यक्रमाचा रोखच बदलून टाकला असल्याची प्रतिक्रिया उमटत होती.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय पदाधिकारी होते. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह दोन केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र सरकारचे ४ मंत्री, ३ खासदार, १ माजी खासदार आणि सात आमदार अशी जंत्रीच होती. बऱ्याच काळाने एवढी उपस्थिती रत्नागिरीत दिसल्याची प्रतिक्रियाही उमटत होती. (वार्ताहर)
पोलिसी बळ : हे कोकणात चालत नाही
महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाला लोकांचा विरोध नाही. विरोध आहे तो त्या प्रक्रियेला, असे नारायण राणे यांनी आपल्या भाषणात सांगितले. लोकांना या प्रक्रियेची योग्य माहिती दिली जात नाही. ती दिली गेली पाहिजे. जर भूसंपादनासाठी पोलीस सर्वसामान्य लोकांच्या घरात घुसून जबरदस्ती करत असतील तर तसे कोकणात चालणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कट्टर राजकीय विरोधक एकत्र
राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, याचा प्रत्यय या कार्यक्रमात आला. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले नेते एकत्र उभे राहून गप्पा मारत होते. नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे कार्यक्रमस्थळी वेळेत दाखल झाले. मात्र, गडकरी आले नसल्याने ते व्यासपीठावर आले नव्हते. तेथे भाजपचे राजन तेली, शिवसेनेचे रवींद्र वायकर आणि सदानंद चव्हाण एकत्र उभे राहून गप्पा मारत होते.
पालकमंत्री बहिष्कृत?
भूमिपूजन कार्यक्रमासाठी येणाऱ्या मान्यवरांच्या स्वागताचे फलक अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. भाजपप्रमाणेच शिवसेनाही त्यात आघाडीवर होती. मात्र, शिवसेनेच्या फलकांवरून पालकमंत्री रवींद्र वायकर यांचे छायाचित्र मात्र गायब होते.