सिंधुदुर्गला तिसरा डोळा उघडायला लावू नका : नितेश राणे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 05:26 PM2018-11-02T17:26:38+5:302018-11-02T17:28:34+5:30
जिल्ह्यातील मच्छीमारांची गळचेपी यापुढे न थांबवल्यास "सिंधुदुर्ग" तिसरा डोळा उघडेल. यापुढे त्यांची अशीच वागणूक राहिली तर गोव्याचा व्यवसाय आमच्याकडे कसा होतो, ते आम्ही पाहू. गोवा नंबरप्लेटच्या गाड्या सिंधुदुर्गात दिसल्या तर त्या सुस्थितीत पुन्हा जाणार नाहीत, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी गोवा सरकारला दिला आहे.
कणकवली : गेल्या साडेचार वर्षात गोवा सरकारची मुजोरी वाढली आहे. सिंधुदुर्गातील मासळीला करण्यात येणारी इन्सुलेट वाहने आणि एफडीआयची सक्ती अन्यायकारक आहे. त्यामुळे गोवा सरकाराकडून जिल्ह्यातील मच्छीमारांची गळचेपी यापुढे न थांबवल्यास "सिंधुदुर्ग" तिसरा डोळा उघडेल. यापुढे त्यांची अशीच वागणूक राहिली तर गोव्याचा व्यवसाय आमच्याकडे कसा होतो, ते आम्ही पाहू. गोवा नंबरप्लेटच्या गाड्या सिंधुदुर्गात दिसल्या तर त्या सुस्थितीत पुन्हा जाणार नाहीत, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी गोवा सरकारला दिला आहे.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार नीतेश राणे पुढे म्हणाले, साडेचार वर्षापासून सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर अराजकता निर्माण झाली आहे. नारायण राणे पालकमंत्री असताना सिंधुदुर्गकडे वाकडया नजरेने पाहण्याची हिंमत कोणाचीही नव्हती. मात्र आता ती स्थिती राहिलेली नाही.
यापूर्वी आरोग्याच्या प्रश्नीदेखील गोवा सरकारची अराजकता पाहायला मिळाली आहे. अजूनही सिंधुदुर्गच्या रुग्णांना बांबुळी रुग्णालयात दुजाभाव मिळत आहे. सिंधुदुर्गातील सत्ताधाऱ्यांचा कणा वाकल्याचे कळून चुकल्यानेच गोव्यासारख्या लहान राज्यासमोर झुकण्याची सिंधुदुर्गवासियांवर वेळ आली आहे. महाराष्ट्राचे सरकार गोवा सरकारशी फक्त चर्चाच करीत रहाणार आहे का? यावर तोडगा कधी काढणार ?
सन २०१४ मध्ये मच्छिमारांवर अन्याय होतो असे चित्र दाखवून सत्ताधाऱ्यांनी मते मिळविली. ज्या अपेक्षेने त्याना सत्ता देण्यात आली. त्यातील किती प्रश्न सुटले ते मच्छीमारांनी आता आम्हाला सांगावे. समुद्रात अजुन एलईडी फिशिंग सुरू आहे. त्यावर अधिकारी कारवाई करताना दिसत नाहीत . मत्स्य विभाग गस्ती नौका नेमक्या कधी घेणार? असा सवाल आमदार राणे यानी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, पारंपारिक मच्छिमारांचे प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच वाढले आहेत. किनारपट्टी वर काही झाले की सध्याचे पालकमंत्री फक्त बैठका घेतात. त्या बैठकाना आमदार व खासदार उपस्थिती लावतात. पण बैठकीत ठरल्याप्रमाणे एकही काम होताना दिसत नाही. सिंधुदुर्गातील किनारपट्टीवर मासेमारीसाठी येणाऱ्या लोकांवर कोणाचाच अंकुश नाही. तर अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. मत्स्य विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळेच अनधिकृत मासेमारीला अभय मिळत आहे. मात्र, भ्रष्ट अधिकारी मोकाट तर त्याना जाब विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींवरच कारवाई होत असल्याचे चित्र आहे.
या सर्व परिस्थितीमुळे दुर्दैवाने पारंपरिक मच्छिमार आत्महत्येला प्रवृत्त झाले तर पालकमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात यावा . अशी आमची मागणी असल्याचे आमदार राणे यांनी यावेळी सांगितले.
बांदा येथे मच्छी खरेदी मार्केट उभारणार !
बांदा येथे सुसज्ज खासगी मच्छी खरेदी मार्केट उभारण्याचा आमचा मनोदय असून त्यादृष्ठिने आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. अशी महत्वपूर्ण घोषणा करतानाच आम्ही फक्त बैठका घेत रहाणार नाही. समस्या सोडविण्यासाठी निश्चितच तोडगा काढण्याचा प्रयत्न करु असे आमदार नीतेश राणे यानी यावेळी सांगितले.
दिवाळी पर्यंत प्लास्टिक बंदीला स्थगिती!
कणकवली शहरात नगरपंचायतीच्यावतीने प्लास्टिक बंदी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, व्यापारी तसेच नागरिकांचा विचार करता ही मोहीम दीवाळी पर्यन्त स्थगित करण्यात यावी असे मुख्याधिकाऱ्याना सांगितले आहे. त्यानी ते कबूल केले आहे.असे आमदार नीतेश राणे यांनी यावेळी सांगितले.