अखंडित वीज पुरवठा करू
By Admin | Published: June 19, 2016 12:45 AM2016-06-19T00:45:30+5:302016-06-19T00:46:18+5:30
प्रभाकर निर्मळे : वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांची अभियंत्यांकडून कानउघडणी, वेंगुर्लेतील समस्यांबाबत बैठक
वेंगुर्ले : कुडाळ-वेंगुर्ले-मळेवाड या ३३ केव्हीच्या लाईनमधील बिघाड तसेच सतत वीजप्रवाह खंडीत होत असलेले कारण दूर करण्यासाठी येत्या पंचवीस दिवसात वेंगुर्ले तालुक्याला अखंडीत वीजप्रवाह देणार असल्याचे आश्वासन देत वेंगुर्ले तालुक्यातील व शहरातील वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी कामातील दिरंगाईबाबत चांगलीच कानउघडणी केली.
वेंगुर्ले शिवसेनेच्यावतीने शहरात व तालुक्यात सततचा खंडीत होणारा वीजप्रवाह व अन्य प्रश्नाबाबत वेंगुर्ले महावितरण कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीस महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे, कुडाळ परिक्षेत्र कनिष्ठ अभियंता ए. पी. चौगुले, कणकवली कार्यकारी अभियंता प्रदीप सोरते, वेंगुर्ले वीज मंडळाचे कनिष्ठ अभियंता एच. डी. जोशी, शहर अभियंता ए. डी. मठकर, ग्रामीण अभियंता ए. जी. चव्हाण, पी. एस. चौगुले तसेच वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश नाईक, शहरप्रमुख विवेक आरोलकर, दक्षता समितीचे अध्यक्ष सचिन वालावलकर, सुरेश भोसले, रजत साळगांवकर, पंकज शिरसाट, डीलीन डिसोजा, वालावलकर, आनंद बटा आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
कुडाळ-वेंगुर्ले, इन्सुली-मळेवाड-वेंगुर्ले, इन्सुली-मळेवाड अशा तीन ठिकाणावरुन वीजपुरवठा दिला जातो. परंतु केवळ कुडाळ-वेंगुर्ले, इन्सुली-मळेवाड-वेंगुर्ले या दोनच भागातून तालुक्याला वीज दिली जाते. परंतु इन्सुली-मळेवाड येथून पर्यायी वीज सेवा दिल्यास शहर व तालुक्याचा वीजप्रवाह खंडीत होण्याची समस्या पूर्णत: दूर होऊ शकते. या सर्व लाईनला अडथळा ठरणाऱ्या भागातील झाडी तातडीने साफ करणे व गंजलेले वीज खांब बदलणे आणि ज्या ठिकाणी वीज खांबावरील नादुरुस्त साहित्य तातडीने बदलण्याबाबत सुचना अधीक्षक अभियंता यांनी दिल्या. या संदर्भात तातडीने टेंडर प्रोसेस करण्यात यावी याबाबत आदेश दिले. (वार्ताहर)