दोडामार्गातील युवकांनी जपली मैत्री

By admin | Published: September 6, 2015 08:51 PM2015-09-06T20:51:37+5:302015-09-06T20:51:37+5:30

दिल दोस्ती दुनियादारी..! : पिकुळेतील लक्ष्मण गवसला आधार

Doda maratha youths maintain friendship | दोडामार्गातील युवकांनी जपली मैत्री

दोडामार्गातील युवकांनी जपली मैत्री

Next

वैभव साळकर --दोडामार्ग --संकटकाळी मदत करतो तो खरा मित्र, आपली चूक लक्षात आणून देतो तो मित्र अशा मैत्रीच्या व्याख्या केल्या जातात वर्षभरापूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘दुनियादारी’ या मराठी चित्रपटाने मैत्री कशी असावी, त्याचे उदाहरण सर्वांना दिले. असेच मैत्रीचे नाते जोपासले आहे दोडामार्गमधील मित्रांनी. पिकुळे-मधलीवाडी येथील लक्ष्मण सोमा गवस यांचे सहा महिन्यात तीन बैल मृत झाले. त्यांच्यातील दोन तर अगदी पावसाच्या तोंडावर. मग शेती करायची कशी? असा प्रश्न गवस कुटुंबियांवर पडला. आपल्या मित्राला आधार दिला पाहिजे, यासाठी त्याच्या दोडामार्गातील मित्रांनी ३० हजार रूपयांची मदत केली आणि मित्रत्वाचे नाते दृढ केले.गवस हे कुटुंबप्रमुख. त्यांच्या कुटुंबात आईसह पत्नी व तीन मुलगे राहतात. एक मुलगा महाविद्यालय, तर दोन विद्यालयीन शिक्षण घेतात. गवस यांचा चरितार्थ केवळ शेती व्यवसायावर चालतो. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर वर्षाची आर्थिक समीकरणे ठरतात. खासकरून पावसाळी शेतीतील भात हे उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. आपल्या कुटुंबाच्या कष्टाच्या जीवावर गवस हे शेती करतात. यासाठी त्यांचे तीन बैल होते. आहे त्याच्यात समाधान मानणारे हे कुटुंब आपल्या गरजा भागवित सुखी होते. पण अचानक दृष्ट लागावी तशी एकेक प्रकरणे धक्काच देणारी ठरली. सुरूवातीला एक बैल अचानक मृत पावला. काहीतरी इजा झाली असेल, उर्वरीत दोन बैलांनी शेती करूया, असे त्यांनी ठरविले आणि आठवडाभरापूर्वी उर्वरीत दोन बैलही दगावले. या प्रकाराने गवस कुटुंबाला अक्षरक्ष: धक्का बसला. आता करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला.
तीनही बैैलांचे पंचनामे करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत नुकसान भरपाई काहीही मिळाली नाही. कुटुंबप्रमुख गवस या प्रकाराने खचले. त्यांनी आपल्या मुलांप्रमाणे वाढवलेले बैल दगावले. हे घरातील कुटुंबाच्या सदस्यांच्या बाबतीत झाल्यासारखे होते. सारे कुटुंब दु:खात बुडाले. ही बातमी त्यांच्या दोडामार्गातील मित्रांना समजली. मित्रासाठी काहीतरी केले पाहिजे, त्याला सावरले पाहिजे, या विचाराने प्रशांत नाईक, (उगाडे), गिरीष कळणेकर (कळणे), अ‍ॅड. दाजी नाईक (उसप), अजित गवस (उगाडे), अशोक लोंढे (कोनाळकट्टा), किरण तळावडेकर (मणेरी), गुंडु केसरकर (घोटगे), सुधीर नाईक (मणेरी), संजय केसरकर (कोनाळकट्टा), संदीप गवस (दोडामार्ग), संतोष देसाई (कुडासे) यांनी एकत्र येत ३० हजार रूपये जमा करीत गवस यांच्याकडे सुपूर्द केले.

याला म्हणतात मैत्री!
दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा होतो. यावेळी कोण मित्राला गुलाब देतो, तर कोणी मॅसेज पाठवितो. मोबाईलचे इनबॉक्स तर फुल्ल झालेले असतात. सोशल मीडियात तर हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. परंतु संकटात सापडलेल्या मित्राला मदत करण्याच्या घटना, मैत्रीचा आधार देवून उभारी देण्याच्या घटना क्वचितच घडतात आणि त्याची दखलही अपवादानेच घेतली जाते. मात्र, मैत्रीच्या नात्याचा दिवा अखंड तेवत ठेवण्याचे काम केले आहे दोडामार्गमधील मित्रांनी. त्यांनी आपल्या मित्राला केलेली मदत ही बराच बोध देणारी आहे. अशा मित्रांना मनापासूून 'सॅल्युट'!

Web Title: Doda maratha youths maintain friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.