दोडामार्ग पंचायत समिती सदस्याचा अपघातात मृत्यू
By admin | Published: June 14, 2017 10:52 PM2017-06-14T22:52:30+5:302017-06-14T22:52:30+5:30
दोडामार्ग पंचायत समिती सदस्याचा अपघातात मृत्यू
x
लोकमत न्यूज नेटवर्क
दोडामार्र्ग : वझरे तिठा येथे दुचाकी आणि भाजी वाहतूक करणारा मिनी टेम्पो यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोडामार्ग पंचायत समितीचे सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत कृष्णा जाधव (वय ४०) यांचा मृत्यू झाला. जाधव मंगळवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना हा अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना म्हापसा-गोवा येथे उपचारासाठी नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.अपघात घडताच टेम्पोचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, जोपर्यंत टेम्पोचालकास अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आयी ग्रामस्थांनी घेत दोडामार्ग-बांदा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. हे रास्ता रोको आंदोलन तीन तास चालले. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोचालकास अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको तूर्तास थांबविण्यात आला.
दोडामार्ग पंचायत समितीचे सदस्य भरत जाधव हे नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास आपली दुचाकी घेऊन आयी येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यापूर्वी ८.३० वाजेपर्यंत ते दोडामार्ग येथील भाजपच्या कार्यालयात उपस्थित होते. त्यानंतर रात्री १० वाजता धाटवाडी येथून टीव्हीवरील बातम्या बघून ते घरी जाण्यासाठी निघाले होते. याच दरम्यान वझरे तिठा येथे ते पोहोचले असता बेळगावहून दोडामार्गच्या दिशेने भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला आपल्या विरुध्द बाजूला जात जोरदार धडक दिली. अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की, दुचाकी मिनी टेम्पोला अडकून काही अंतरावर फरफटत गेली आणि त्यानंतर टेम्पो पलटी होऊन त्याखाली चिरडली. मात्र, अपघात घडताच जाधव दुचाकीवरून फे कले गेल्याने त्यांचे डोके जोरात आदळून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तसेच त्यांचा पाय व हातही मोडला. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी म्हापसा-गोवा येथे हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
ग्रामस्थांचा तीन तास रास्ता रोको
दरम्यान, अपघात घडताच टेम्पोचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीसही उशिराने घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे संतापलेल्या आयी ग्रामस्थांनी भरत जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत दोडामार्ग-बांदा राज्यमार्गावरच रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल तीन तास हा रास्ता रोको चालला.