दोडामार्गला मैदानाची प्रतीक्षा!

By admin | Published: July 8, 2014 10:46 PM2014-07-08T22:46:52+5:302014-07-08T23:20:01+5:30

तालुका निर्मितीला १५ वर्षे

Doda road waiting for the field! | दोडामार्गला मैदानाची प्रतीक्षा!

दोडामार्गला मैदानाची प्रतीक्षा!

Next

: शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातील सुविधांची कमतरता
कसई दोडामार्ग : तालुक्यात क्रिकेटपटू आणि फुटबॉलपटूंची कमी नाही. मात्र, खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने या खेळाडूंची ‘स्टार’ बनण्याची स्वप्ने स्वप्नेच रहात आहेत. तरीही येथील स्थानिक खेळाडू घरच्या मैदानांवर खेळून आपली हौस भागविताना दिसून येत आहेत. पावसानेही विश्रांती घेतली असल्याने आणि फुटबॉल विश्वचषकाची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचल्याने त्याचे पडसाद तालुक्यातही दिसू लागले आहेत.
दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन १५ वर्षे पूर्ण झाली. परंतु तालुक्याचा अपेक्षेएवढा विकास झाला नाही. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातीलही सुविधांची येथे कमतरता असल्याने तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धात्मक क्षेत्रात मागे पडत आहेत. शिक्षण आणि खेळ हे दोन्ही विषय विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक आहेत. शिक्षणामुळे ज्ञान मिळते तर खेळामुळे आरोग्य सुदृढ राहून विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम बनण्यास मदत होते. त्यामुळे दैनंदिन जीवनातील ताण-तणावांचा सामना करून सर्व आव्हाने पेलण्याची क्षमता वाढते. परंतु तालुक्यात इतर सुविधांबरोबरच खेळासाठी क्रीडांगण उपलब्ध नसल्याने विद्यार्थी खेळापासून वंचित रहात आहेत.
तालुक्यात क्रिकेटसह फुटबॉल खेळणारे खेळाडूही मोठ्या प्रमाणावर असून राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची क्षमता त्यांच्यात आहे. परंतु तालुका क्रीडांगण उपलब्ध नसल्याने या खेळाडूंची क्षमता गावापुरतीच मर्यादित राहत आहे. क्रीडांगणाअभावी गावातील मैदानसदृश भागात क्रिकेट स्पर्धा भरविल्या जातात. तरीही या स्पर्धांना शेकडो खेळाडू उपस्थित असतात आणि प्रेक्षकही. कॉलेज, शाळा सुटल्यानंतर गावातील मैदाने गजबजू लागतात.
स्पर्धांमध्ये आयोजक हजारो रुपयांची बक्षिसे लावतात. यावर्षी तर ५ लाख रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेला विविध भागातील खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. क्रिकेटनंतर दुसरा महत्त्वाचा खेळ म्हणजे फुटबॉल. या खेळामुळे पूर्ण शारीरिक व्यायाम होतो. बुध्दीही सतेज बनते. या खेळासाठीही तालुक्यात सोयीसुविधायुक्त मैदान नाही. परंतु खेळाडू मात्र गावातीलच छोट्यामोठ्या मैदानांवर फुटबॉल खेळतात. स्पर्धाही आयोजित केल्या जातात. पे्रक्षकांचीही गर्दी असते. विशेषत: तालुक्यातील माटणे, आंबडगाव या गावात फुटबॉलप्रेमी आणि खेळाडू अधिक आहेत. ब्राझिल येथे सध्या सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा ज्वर येथेही येऊन पोहोचला असून येथील फुटबॉलप्रेमी सामने पाहण्यासाठी दूरदर्शनसमोर ठाण मांडून बसलेले दिसून येतात. पावसाच्या विश्रांतीमुळे युवकही घरच्या मैदानावर फुटबॉलचा आनंद लुटत आहेत.
क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्ही खेळांसाठी तालुक्यात क्रीडांगण व्हावे, अशी मागणी खेळाडूंनी राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी, आमदार दीपक केसरकर, माजी खासदार नीलेश राणे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्याकडे केली होती. क्रीडांगणासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन या सर्वांनी दिले होते. परंतु अद्यापही याबाबत सकारात्मक प्रयत्न होताना दिसत नाहीत. तालुक्यातील सर्व संघटना, लोकप्रतिनिधी, नेते यांनी प्रयत्न केल्यास तालुक्यात क्रीडांगण नक्कीच होऊ शकते. परंतु त्यासाठी आवश्यकता आहे एकसंघतेची, सकारात्मकतेची! (वार्ताहर)

Web Title: Doda road waiting for the field!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.