पावसामुळे दोडामार्गातील वीज गायब
By admin | Published: June 14, 2016 08:48 PM2016-06-14T20:48:42+5:302016-06-15T00:06:20+5:30
‘महावितरण’चा कारभार : ग्रामस्थ आंदोलन करणार
साटेली भेडशी : पहिल्या पावसामुळे चिंब झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावे अंधाराच्या साम्राज्यात राहिली. वीज कर्मचाऱ्यांनी लाईनच्या दुरुस्तीकडे व साफसफाईकडे वेळेत पूर्णत: दुर्लक्ष केल्याने १५ दिवसांपासून दोडामार्ग तालुक्यात अनेक गावांत विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. खंडित वीजपुरवठा, कामांबाबतचा पाठपुराव्याचा अभाव आणि कार्यक्षेत्र अंतर्गत गावातील मुख्य समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तालुकावासीयांना अंधारात राहावे लागले. यामुळे याचा जाब विचारण्यासाठीच तालुकावासीय आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
दोडामार्ग तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाला; पण यामुळे मोठा वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा निर्माण झाला. यातच दोडामार्ग वीज कार्यालयातील शाखा अभियंता, कर्मचारी, वायरमन यांचे समन्वय नसल्याने कर्मचाऱ्यांचाही मनमानी कारभार सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील विद्युतवाहिन्यांवर आलेली झाडी, बांबू, झाडी-झुडपे तोडून विद्युतवाहिनी मोकळी करणे व तसे काम संबंधित कर्मचाऱ्यांकडून करून घेणे, ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना त्याकडे अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने थोडासाही पाऊस पडला तरी वीजपुरवठा खंडित अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे महावितरणच्या कारभाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. शहरासह अनेक गावांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून विजेची गंभीर समस्या असून, दिवस-रात्री सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. फोनही बंद असल्याने वीज कंपनीच्या कारभाराबाबत संतापाची लाट उसळली आहे. विजेवर अवलंबून असलेल्या उद्योग व्यवसाय, नळपाणी योजना यांनाही त्याचा फटका बसत आहे. त्यातच वाढीव बिलाच्या माध्यमातून व विविध उपकरांद्वारे सर्वसामान्य वीज ग्राहकांना लुबाडण्याचे काम दोडामार्ग महावितरणकडून सुरू असतानाही सत्ताधारी लोकप्रतिनिधींसह तालुक्यातील विरोधी पक्षांचे नेते मंडळीही या प्रकाराकडे सोईस्कररीत्या डोळेझाक करत असल्याने लोकप्रतिनिधींबाबतही तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)