दोडामार्गात बेकायदेशीर वाहतूक रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 07:51 PM2019-06-06T19:51:17+5:302019-06-06T19:53:15+5:30
दोडामार्ग शहरातून मोठी वाहने वाहतूक करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. याबाबत वारंवार पोलीस प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधूनही कारवाई होत नसल्याने बुधवारी दोडामार्ग शहरवासीयांनी मायनिंगचे ट्रक रोखून धरले. जोपर्यंत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वाहतुकीवर ठोस कारवाई होत नाही व कायमस्वरूपी बाजारातून अवजड वाहतूक बंद होत नाही, तोपर्यंत ट्रक सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा यावेळी घेतला होता.
दोडामार्ग : दोडामार्ग शहरातून मोठी वाहने वाहतूक करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. याबाबत वारंवार पोलीस प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधूनही कारवाई होत नसल्याने बुधवारी दोडामार्ग शहरवासीयांनी मायनिंगचे ट्रक रोखून धरले. जोपर्यंत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वाहतुकीवर ठोस कारवाई होत नाही व कायमस्वरूपी बाजारातून अवजड वाहतूक बंद होत नाही, तोपर्यंत ट्रक सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा यावेळी घेतला होता.
यावेळी दोडामार्ग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप शहराध्यक्ष योगेश महाले, स्वाभिमान शहराध्यक्ष दादा बोर्डेकर, काँग्रेस शहराध्यक्ष संदेश बोर्डेकर, समीर रेडकर, रंगनाथ गवस, निलेश रेडकर, विशाल चव्हाण आदींसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
दोडामार्ग शहरात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत बऱ्याच वेळा कल्पना देऊनही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने दोडामार्ग युवकांमध्ये नाराजी असून युवकांनी पुन्हा एकदा एकत्र येत वाहने रोखली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. यावेळी या बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अवजड वाहनांवर कारवाई करा, असे उपस्थित युवकांनी सांगितले. पोलिसांनी हे काम वाहतूक पोलिसांचे असल्याचे सांगत हात वर केले.
ट्रक रोखले
दोडामार्ग शहरातील संतप्त युवकांनी ट्रक रोखले. जोपर्यंत अवजड वाहतूक बाजारपेठेतून कायमस्वरूपी बंद होत नाही तसेच या गाड्यांवर योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला होता.