दोडामार्ग भाजपा तालुका कार्यकारिणी बरखास्त, जिल्ह्यातील आणखीन दोन पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 05:28 PM2022-02-15T17:28:03+5:302022-02-15T17:28:30+5:30
ज्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत चांगले काम केले त्यांना पुन्हा संधी दिली जाणार
कणकवली : दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी करून पक्षविरोधी कुरघोड्या केल्याबद्दल त्या तालुक्याची भाजपा पक्ष कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
तसेच सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून नवीन कार्यकारिणी तयार करताना ज्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत चांगले काम केले त्यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. नूतन कार्यकारिणी निवड होईपर्यंत भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रमोद कामत आणि महेश सारंग हे दोडामार्ग प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत,असेही ते म्हणाले.
कणकवली येथील भाजप कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, बबलू सावंत, सुशील सावंत आदी उपस्थित होते.
राजन तेली म्हणाले, जिल्हा बँक ते नगरपंचायत निवडणुकीत काही भाजपा कार्यकर्त्यानी पक्षविरोधी काम केल्याचा फटका पक्षाला बसला आहे. ही बाब पक्षाने गांभीर्याने घेतली आहे. याप्रकाराबाबत लवकरच कारवाई करणार असल्याचे आपण यापूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा बँक निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याबद्दल आज (मंगळवारी) जिल्ह्यातील दोन पदाधिकाऱ्यांना बडतर्फीची कारवाई का करू नये ? अशी कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचेही तेली यावेळी म्हणाले.