नितेश राणेंना त्यांच्या मतदारसंघातील अवैध धंदे दिसत नाहीत का?, मनसे नेते परशुराम उपरकरांचा सवाल
By सुधीर राणे | Published: November 15, 2022 06:07 PM2022-11-15T18:07:04+5:302022-11-15T18:08:34+5:30
गृहमंत्री, पालकमंत्री स्वतःच्या पक्षाचे असूनही आमदार नितेश राणेंना अवैध धंद्यांमुळे पोलिसांविरोधात आंदोलन करण्याची भाषा शोभत नाही असा टोलाही लगावला.
कणकवली: जिल्ह्यातील अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्याबाबत कारवाई करण्यासाठी मनसे शिष्टमंडळाने नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना निवेदन दिले आहे. मात्र, आमदार नितेश राणे यांना फक्त केवळ देवगड, जामसंडे या दोन गावातीलच अवैध धंदे दिसतात. त्यांच्या मतदारसंघातील अन्य दोन तालुक्यांतील अवैध धंदे दिसत नाहीत का? असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला. कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना उपरकर म्हणाले, कणकवली तालुक्यातील ज्या माजी सरपंचाची गाडी अवैध दारू नेताना पकडली गेली. तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे ? याची माहिती आमदार राणे यांनी घ्यावी. गृहमंत्री, पालकमंत्री स्वतःच्या पक्षाचे असूनही आमदार नितेश राणेंना अवैध धंद्यांमुळे पोलिसांविरोधात आंदोलन करण्याची भाषा शोभत नाही असा टोलाही लगावला.
दारू, मटका आणि अंमली पदार्थांमुळे अनेक तरुणांनी जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत. अवैध धंद्यात कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असले तरीही युवा पिढी बरबाद करणाऱ्या या बेकायदेशीर धंद्यांना कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठीशी घालू नये. तरुण कार्यकर्त्यांना काम धंदा नसल्यास ते अवैध धंद्यांकडे वळत असतील तर त्यांना वैध धंद्यांकडे वळविले पाहिजे. राजकर्त्यांनी या तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहनही उपरकर यांनी केले.