सहा महिन्यात साडेतीनशे जणांवर कुत्र्यांचे हल्ले
By admin | Published: February 29, 2016 10:47 PM2016-02-29T22:47:33+5:302016-03-01T00:10:24+5:30
सावंतवाडी परिसरातील स्थिती : रेबीजचा तुटवडा; मात्र कुत्र्याचे हल्ले वाढताहेत, कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची गरज
अनंत जाधव-- सावंतवाडी -सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेबीज लसीचा तुटवडा भासत असतानाच मात्र दुसरीकडे माणसावर कुत्र्यांचे हल्ले वाढत चालले आहेत. गेल्या सहा महिन्यात सावंतवाडीतील शासकीय रूग्णालयात कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले साडेतीनशे रूग्ण दाखल झाले असून, आतापर्यंत अकराशे रेबीज लसीचा वापर करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांची संख्या काही कमी नाही. ग्रामीण भागात मुलांपासून वयोवृद्धांवर कुत्र्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कुत्र्याने हल्ले केले की त्या रूग्णांवर खाजगी रूग्णालयात उपचार होत नसल्याने त्यांना सरकारी रूग्णालयातच दाखल करावे लागत आहे. सावंतवाडी परिसरात तर जिल्ह्याच्या इतर भागापेक्षा कुत्र्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले असून, गेल्या सहा महिन्यात दिवसाकाठी दोन रूग्ण हे रूग्णालयात कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अवस्थेत येत असतात. यामध्ये सावंतवाडी, बांदा, माणगाव, माजगाव, आरोंदा आदी गावांचा मोठा सहभाग असून याठिकाणचे रूग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमींची संख्या सतत वाढत चालली, तरी शासनाकडून हवा तसा रेबीज लसीचा पुरवठा मात्र होत नाही. गेल्या तीन महिन्यात हाताच्या बोटावर मोजण्याएवढाच रेबीज लसीचा पुरवठा शासनाकडून झाला आहे. यासाठी कुटीर रूग्णालय प्रशासनाकडून चार ते पाच वेळा मागणी केली. त्यानंतर हा पुरवठा करण्यात आला. तरीही रेबीज लस रूग्णालयात कमी पडत आहे.
सावंतवाडी कुटीर रूग्णालयात गेल्या सहा महिन्यात कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले ६३२ रूग्ण दाखल झाले असून, त्यांच्यासाठी एक हजार एकशे अठरा रेबीज लसीचा वापर करण्यात आला आहे. सप्टेंबर २०१५ ते फेबु्रवारी २०१६ या सहा महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक कुत्र्याचे हल्ले नोव्हेंबर २०१५ मध्ये झाले असून, ८१ जणांवर कुत्र्याने हल्ले केले आहेत. त्यासाठी २२२ रेबीज लसींचा वापर करण्यात आला. तर फेबु्रवारी २०१६ मध्ये ३२ जणांवर कुत्र्याने हल्ला केला असून, त्यात ९६ रेबीज लसीचा वापर करण्यात आला आहे. एखाद्यावर कुत्र्याने हल्ला केला की, त्या रूग्णाची प्रतिकार क्षमता तसेच कुत्रा कोणत्या प्रकारातील आहे, याची माहिती घेऊनच त्यावर उपचाराच्या पध्दतीचा अवलंब केला जात आहे. एकीकडे कुत्र्याचे हल्ले वाढले असताना मात्र प्रशासन मोकाट कुत्र्यांवर कशा प्रकारे आवर घातला जावा, यावर गंभीर दिसत नाही. सर्व स्तरातून ओरड झाली की फक्त हातावर मोजण्याएवढेच कुत्रे पकडले जातात. पण त्यानंतर कुठे ठेवायचे? काय करायचे, याचे धोरणच प्रशासनाकडे नसून अनेकवेळा कुत्रे पिसाळले की लोकांनाच मग त्यावर उपाय योजना करावी लागत आहे.
सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस कुत्र्यांची दहशत माजली असून त्यांना आवर घालणे आता प्रशासनालाही डोईजड होत चालले आहे. परिणामी नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नसबंदीनंतरही कमी होत नाहीत : साळगावकर
कुत्र्यांचे हल्ले वाढले : पाटील
आम्ही ज्या प्रमाणात रेबीज लसीची मागणी करतो, तसा पुरवठा आम्हांला केला जातो. हा पुरवठा मागणी तसा पुरवठा असतो. पण गेल्या काही महिन्यात माणसांवर कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे रेबीज लसीचा वापरही मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे, अशी माहिती कुटीर रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांनी दिली आहे.
कुत्र्यांबाबत शासनानेच कोणतातरी ठोस निर्णय घेतला पाहिजे. तसेच कुत्र्यांना पकडल्यानंतर ठेवण्यासाठी अनेक वेळा जागाही अपुरी पडत असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले आहे.
सावंतवाडी नगरपालिका आपल्यापरीने कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत असते.