स्वत:ची मालमत्ता विकून राजकारण करतो ही निव्वळ स्टंटबाजी, प्रविण भोसलेंची मंत्री केसरकरांवर टीका
By अनंत खं.जाधव | Published: October 2, 2024 03:30 PM2024-10-02T15:30:44+5:302024-10-02T15:31:12+5:30
निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता लपवल्या
सावंतवाडी : मालमत्ता विकून राजकारण केले असे म्हणणाऱ्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःच्या मालमत्ता लपवून ठेवल्या त्यावर आजही सर्वोच्च न्यायालयात खटले सुरू आहेत. त्यामुळे आता निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सहानुभूती मिळवण्यासाठी पुन्हा केसरकर मालमत्ता विकून राजकारण करतो असे नाटक करतील त्याला जनतेने फसू नये असे आवाहन माजी मंत्री प्रविण भोसले यांनी केले. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी संपली त्याचप्रमाणे मंत्री केसरकर यांचीही गॅरंटी संपलेली आहे असा टोला लगावला. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अनंत पिळणकर आधी पदाधिकारी उपस्थित होते.
अर्चना घारे महाविकास आघाडीच्या उमेदवार
भोसले म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेला आता बदल हवा आहे. जनतेमध्ये केसरकरांच्या बद्दल प्रचंड रोष आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून अर्चना घारे याच आमच्या उमेदवार असणार आहेत. त्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी सगळ्यांचीच गरज लागणार असल्याचे भोसले म्हणाले.
केसरकरांनी लोकांची दिशाभूल केली
केसरकर यांच्याशी माझे वैयक्तिक वाद नाहीत. मात्र आजपर्यंत केसरकर यांनी मंत्रिपदे भोगूनही म्हणावा तसा मतदारसंघाचा काहीच विकास केलेला नाही. मल्टीस्पेशालिटीबाबत लोकांची दिशाभूल केली असून केसरकर यांची गॅरंटी कधीच संपलेली आहे. त्यांच्यावर जनतेचा आता विश्वास राहिलेला नसून मल्टीस्पेशालिटी बाबत ते कोणाचा कसा वापर करतील हे सांगता हे येत नाहीत भविष्यात लखम सावंत यांच्या बाबतीतही काय बोलतील यांचा नेम नाही असेही भोंसले म्हणाले.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता लपवल्या
केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी मंत्री केसरकर यांनी यापूर्वी आपण मालमत्ता विकून राजकारण केले असे म्हटले होते. मात्र मंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मालमत्तेत वाढ झाली आहे. निवडणुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करताना त्यांनी स्वतः विकत घेतलेल्या मालमत्ता लपवल्या होत्या या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असल्याची आठवण ही त्यांनी यावेळी करून दिली.