दुखंडे यांनी शिवसेनेच्या अपयशाचे श्राद्ध घालावे
By admin | Published: September 28, 2016 10:55 PM2016-09-28T22:55:13+5:302016-09-28T23:10:30+5:30
मंदार केणी : नैतिक अधिकार गमावल्याने त्यांनी राजीनामा द्यावा
आचरा : वायंगणी-तोंडवळी येथे साकारणारा सी-वर्ल्ड प्रकल्प जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये सी-वर्ल्डबाबत मतांचे राजकारण करून निवडून आलेले आमदार, खासदार सी-वर्ल्डबाबत कोणतीच ठोस भूमिका घेताना दिसत नाही.
याबाबत जनतेकडूनही या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा राहिल्या नाहीत. शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य उदय दुखंडे गावातील ग्रामस्थांची सकारात्मक भूमिका असतानाही मूठभर लोकांना एकत्र करून विरोध करत आहेत. दुखंडे यांनी वायंगणी येथे सी-वर्ल्डचे श्राद्ध घालण्यापेक्षा शिवसेनेच्या अपयशाचे श्राद्ध घालावे, असा सनसनाटी टोला काँग्रेस तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी लगावला आहे.
वायंगणी येथील ग्रामस्थांची सी-वर्ल्ड विरोधी भूमिका नसतानाही त्यांच्या भावनांशी खेळण्याचे काम दुखंडे करत आहेत. गावातील भोळ्याभाबड्या लोकांची माथी भडकविण्याचा एककलमी कार्यक्रम दुखंडे यांचा असून जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून दुखंडे यांनी पंचायत समिती सदस्यत्वाचा व पक्षाचा राजीनामा द्यावा, असेही केणी यांनी सांगितले. आचरा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी विभागीय अध्यक्ष विनायक परब, संतोष कोदे, राजन गावकर, चंदन पांगे, दत्ता वराडकर, प्रकाश हडकर, भाऊ हडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विकासाचा कायापालट करण्याची क्षमता असणारा हा प्रकल्प मालवणला खेचून आणला. त्यावेळी या प्रकल्पाचे भूमिपूजन करणारे दुखंडे आता मतांसाठी स्वार्थी राजकारण करत आहेत.
गावातील ग्रामस्थांना विस्थापित न करता योग्य व अधिकचा मोबदला देऊन हा प्रकल्प राबविण्याची काँग्रेसची भूमिका होती. मात्र शिवसेनेने विरोधाची ठिणगी टाकत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजकारण केले.
मात्र, निवडून आल्यानंतर सेनेच्या मंडळींनी प्रकल्पाच्या विरोधात लोकसभा अथवा विधानसभेत प्रश्न उपस्थित केला नाही. येथील जनतेच्या दिखाव्यासाठी विरोधाचे आभासी चित्र निर्माण केले जात असल्याची टीका मंदार केणी यांनी यावेळी
केली. (वार्ताहर)
दुखंडे हे झारीतील शुक्राचार्य
खासदार विनायक राऊत यांच्या गावभेट दौऱ्यात ग्रामस्थांनी शिवसेनेचे पदाधिकारी गावात एजंट म्हणून वावरत असल्याचे सांगितल्याने केवळ मतांसाठी सी-वर्ल्डला विरोध करायचे स्वार्थी राजकारण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सेनेचे पदाधिकारी जागा विकत असल्याने प्रकल्पाचे राजकारण करणारे दुखंडे हे झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यामुळे वायंगणी ग्रामपंचायतीसमोर सी-वर्ल्डचे श्राद्ध घालणे ही दुखंडे यांची नौटंकी आहे. त्यामुळे स्वत:च्या पक्षाच्या अपयशाचे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय येथे श्राद्ध घालावे. त्यानंतरच त्यांना गाव त्यांच्या पाठीशी आहे की नाही हे समजेल,
- मंदार केणी, काँग्रेस तालुकाध्यक्ष
शिवसेनेची दुटप्पी भूमिका लोकांसमोर
शिवसेनेकडून पहिल्यापासून सी-वर्ल्डचे स्वार्थी राजकारण करण्यात आले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार, खासदारांकडून सी-वर्ल्डबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही. खासदार गावात बैठका घेत असताना आमदार मालवण येथे लपून बसतात, हे दुर्दैव आहे. शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेमुळे जनता नैतिक अधिकार गमावून बसली आहे. सी-वर्ल्डबाबत दिशाभूल करून दुखंडे हे ग्रामस्थांची माथी भडकवित आहेत. भविष्यात जिल्ह्यातील विकासकामे ठप्प झाल्यास तेच जबाबदार असतील. किंबहुना जिल्ह्यातील जनताच दुखंडेचे श्राद्धरुपी चिंतन करेल, असेही मंदार केणी यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान, स्पष्ट केले.