मच्छिमारांनी लावलेल्या रापण मासेमारी जाळीत अडकले चक्क डॉल्फिन मासे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 07:27 PM2021-11-12T19:27:47+5:302021-11-12T19:30:23+5:30
मालवण चिवला बिचवर जाळ्यात अडकलेले डॉल्फिन मासे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मच्छीमारांनी सर्व डॉल्फिनना पुन्हा सोडले समुद्रात
मालवण : पारंपरिक मच्छिमारांनी लावलेल्या रापण मासेमारी जाळीत चक्क डॉल्फिन मासे सापडले. जवळपास १५ हून अधिक डॉल्फिन मासे रापणीच्या जाळ्यात अडकल्याचे मच्छिमारांच्या निदर्शनास आल्यानंतर या सर्व डॉल्फिनना पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आले. दरम्यान डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटकांनीही गर्दी केली होती. मालवण चिवला बिचवर हे डॉल्फिन सापडले.
मालवण चिवला बीच समुद्र सफारी व डॉल्फिन दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. या बीचला पर्यटक मोठ्या संख्येने पसंती देतात. या ठिकाणी अनेकवेळा डॉल्फिनचे दर्शन हमखास मिळते.
शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रेवतळे येथील न्यू रापण संघाने नेहमीप्रमाणे रापणीची जाळी ओढली होती. यानंतर सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रापण संघातील मच्छिमारांनी ही जाळी ओढली असता जाळ्यात सुमारे १५ हून अधिक डॉल्फिन मासे अडकून असल्याचे निदर्शनास आले. हे पाहताच मच्छिमारांनी या डॉल्फिनना तात्काळ समुद्रात सोडले.