मालवणात घरेलू कामगारांचा मोर्चा

By admin | Published: December 12, 2014 10:05 PM2014-12-12T22:05:23+5:302014-12-12T23:41:12+5:30

मागण्यांचे निवेदन : प्रश्न सोडवणुकीसाठी पाठपुराव्याचे तहसीलदारांचे आश्वासन

Domestic Workers Front in the Malvan | मालवणात घरेलू कामगारांचा मोर्चा

मालवणात घरेलू कामगारांचा मोर्चा

Next

मालवण : घरेलू कामगार आणि बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गच्यावतीने मालवण तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कामगारांचे प्रलंबित प्रश्न व मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवून शासन दरबारी योग्य न्याय मिळावा अन्यथा सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या घरांवर मोर्चा नेऊ व राज्यभर मोठे आंदोलन उभे करू असा इशारा संघाचे जिल्हा सरचिटणीस हरी चव्हाण यांनी यावेळी प्रशासनाला दिला. यावेळी तहसीलदार वनिता पाटील यांनी घरेलू व बांधकाम कामगारांचे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे पाठवून प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी योग्य तो पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस हरी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मालवणमधील बहुसंख्य घरेलू कामगार महिला व बांधकाम कामगार मोर्चात सहभागी झाले होते. तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर व शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे यांनी उपस्थित राहून मोर्चाला पाठींबा दर्शविला.
यावेळी हरी चव्हाण यांनी तहसीलदारांबरोबरच सत्ताधारी पक्षांचे प्रतिनिधी म्हणून बाबा मोंडकर व बबन शिंदे यांनी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन सादर करून प्रश्नांची गंभीरपणे दखल घेवून ते सोडविण्यात यावेत, अशी मागणी केली.
भरड दत्तमंदिर येथून निघालेला कामगारांचा मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर आला असता हरी चव्हाण यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. श्री. चव्हाण म्हणाले, घरेलू व बांधकाम कामगार काबाडकष्ट करून आपली रोजीरोटी मिळवित आहेत. कामगारांच्या कल्याणासाठी शासनाकडून आजपर्यंत विविध योजना मांडल्या गेल्या. मात्र, त्यांचा परीपूर्ण लाभ कामगारांना मिळाला नाही.
या आधीच्या आघाडी सरकारनेही कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. तसेच आता राज्यात सत्तेत असलेल्या युती सरकारने निवडणुकी दरम्यान कामगारांचे प्रश्न सोडविण्याची आश्वासने दिली. मात्र, सत्तेत आल्यावर आश्वासने विसरून गेले. कामगार कायदा लागू करणे, कामगार म्हणून दर्जा मिळावा. कामगार नोंदणी सुलभ व्हावी, दर तीन महिन्यांनी कामगारांची आरोग्य तपासणी व्हावी, प्रसुती लाभ २000 रूपयापर्यंत मिळावा, कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना क्लेमची रक्कम मिळावी, मानधन व नोंदणी प्रमाणपत्र मिळावे. अशा कामगारांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही चव्हाण यांनी दिला.
यावेळी उपस्थित भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर व शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे यांनी मोर्चाला पाठींबा दर्शवित गेल्या १५ वर्षात आघाडी सरकार कामगारांना न्याय मिळवून देऊ शकले नाही. तो न्याय भाजप-शिवसेना युती सरकार निश्चित मिळवून देईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Domestic Workers Front in the Malvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.