डबल डेकर ट्रेनची चाचपणी सुरू कोकणवासीयांना मिळाला दिलासा : रेल्वे प्रशासनाने घेतली दखल
By admin | Published: May 19, 2014 12:31 AM2014-05-19T00:31:35+5:302014-05-19T00:33:25+5:30
सावंतवाडी : दिवा- सावंतवाडी रेल्वेला रोह्यात भीषण अपघात झाल्यानंतर आता रेल्वेने विशेष खबरदारी घेण्यात सुरुवात केली आहे. त्यानुसार या मार्गावर
सावंतवाडी : दिवा- सावंतवाडी रेल्वेला रोह्यात भीषण अपघात झाल्यानंतर आता रेल्वेने विशेष खबरदारी घेण्यात सुरुवात केली आहे. त्यानुसार या मार्गावर कमीत कमी गाड्यांमधून जास्तीत जास्त प्रवासी नेण्याच्या इराद्याने आता प्रथमच डबल डेकर रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगाची चाचणी शनिवारपासून सुरू झाली. ही रेल्वे रविवारी सावंतवाडीतील मळगाव स्थानकावर दुपारी दाखल झाली. परंतु न थांबताच पुढे निघून गेली. मुंबई- मडगाव मार्गावर प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहत असते. कोकणची रेल्वे कोकणी माणसासाठी नाही, अशी नेहमी ओरड होत असते. त्यामुळे कोकण रेल्वे कॉपोरशनने पुढाकार घेत आता नवीन डबल डेकर ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनचा फायदा मोठ्या प्रमाणात कोकणवासीयांना होणार आहे. अनेक वेळा रेल्वेत होणारी गर्दी आणि प्रवाशांच्या मागणीमुळे या मार्गावर वेळोवेळी होणार्या अडचणी कमी करण्यासाठी ही ट्रेन सोडण्यात आली आहे. शनिवारी दुपारी ही ट्रेन मुंबईहून गोव्याकडे जाण्यास निघाली. शनिवारी रात्री उशिरा ती रत्नागिरीत पोचली. त्यानंतर रविवारी या रेल्वेने सिंधुदुर्गकडे प्रयाण केले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही ट्रेन सावंतवाडीतील मळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचली. ताशी वीस किमी अशा वेगाने ही ट्रेन धावत होती. ही रेल्वे सोडण्यामागे फक्त या मार्गाची चाचणी हाच उद्देश असून रात्री उशिरापर्यत ही ट्रेन गोव्यात दाखल होणार आहे. याबाबत येथील रेल्वे स्थानकाच्या कर्मचार्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ही डबल डेकर ट्रेन नेमकी केव्हा सुरू होणार आम्हाला माहीत नाही. पण सध्या या ट्रेनची चाचपणी सुरू असून तसा अहवाल किंवा अन्य काही असेल ते अधिकारी वरिष्ठांना देतील, असे सांगितले. (प्रतिनिधी)