डॉ. आंबेडकर पुतळ्याचे १४ मे रोजी अनावरण
By admin | Published: April 18, 2016 09:13 PM2016-04-18T21:13:11+5:302016-04-19T00:36:44+5:30
बौद्ध सेवा संघ : वैभववाडीत १२ ते १५ मे रोजी ‘भीमोत्सव’; राज्यस्तर चित्ररथ, देखावा स्पर्धा
वैभववाडी : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त १२ ते १५ मे या कालावधीत आंबेडकरी विचारांचा ‘भीमोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. वैभववाडी येथील डॉ आंबेडकर स्मारक भवनात होणाऱ्या या कार्यक्रमानिमित्त १३ मे रोजी ‘भीमसंध्या’ ही संगीत मैफील होणार आहे. भीमोत्सवाचे औचित्य साधून १४ मे रोजी येथील स्मारकात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून याच दिवशी राज्यस्तरीय ‘चित्ररथ व जिवंत देखावा’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष यशवंत यादव व संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील डॉ आंबेडकर स्मारक भवनात वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी शुभांगी यादव, शरद कांबळे, रवींद्र पवार, डॉ देवेंद्र जाधव, राजेंद्र कांबळे, रुपेश कांबळे, चंद्रकांत जाधव, आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील नेते, राजकीय नेते, सनदी अधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले जाणार आहे.
भीमोत्सवाचा प्रारंभ गुरुवार १२ मे रोजी केला जाणार आहे. या दिवशी वैभववाडी शहराची स्वच्छता व सजावट केली जाणार आहे. शुक्रवार १३ रोजी सकाळी १0 ते ४ आरोग्य शिबिर, दुपारी ३ ते सायंकाळी ५ बालकोत्सव, सायंकाळी ६ ते रात्रौ ८ महाराष्ट्रातील नामवंत गायकांची मैफील ‘भीमसंध्या’, शनिवार १४ रोजी पहाटे ५.३0 ते सकाळी ७ बुद्ध पहाट- संगीतमय आदरांजली, सकाळी १0 ते १२ करुणानंद महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मदेसना, दुपारी ३ ते सायंकाळी ५ डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित चित्ररथ व जिवंत देखावे स्पर्धा, सायंकाळी ५.३0 वा. डॉ. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण केले जाणार असून सायंकाळी ६ वा. अभिवादन सभा, रात्री ८ वा राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अन्वीकर यांचा ‘चलो बुद्ध की ओर’ हा भीमगीतांचा संगीतमय आविष्कार सादर केला जाणार आहे.
रविवारी सकाळी १0 ते दुपारी १२.३0 युवक युवती मेळावा, दुपारी ३ ते सायंकाळी ७ महिला मेळावा, सायंकाळी ७ ते रात्री १0 ‘वैभववाडी आयडॉल’ प्रबोधन भीमगीत गायन स्पर्धा, रात्री १0 ते ११ विविध स्पर्धांचे वितरण केले जाणार आहे. १४ रोजी होणारी चित्ररथ व जिवंत देखावा स्पर्धा राज्यस्तरीय असून या स्पर्धेसाठी प्रथम २५ हजार १२५, द्वितीय १५ हजार १२५, तृतीय १0 हजार १२५, चतुर्थ ७ हजार १२५, पाचवे पारितोषिक ५ हजार १२५ व १ हजार १२५ रुपयांची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत, तर ‘वैभववाडी आयडॉल’ भीमगीत गायन ही स्थानिक कलाकारांसाठी वैयक्तिक स्पर्धा असून या स्पधेर्साठी अनुक्रमे ५,१२५, ३,१२५, २,१२५, १,१२५ व ५२४ रुपयांची उत्तेजनार्थ पाच पारितोषिके आहेत, असे यशवंत यादव व संजय जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बौद्ध सेवा संघासाठी दुग्धशर्करा योग !
डॉ.बाबासाहेबांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षात वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा आमच्यासाठी दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. विशेष म्हणजे, १४ मे १९३८ रोजी डॉ. बाबासाहेबांनी दक्षिण कोकणचा दौरा केला होता. त्यामुळेच बौद्ध सेवा संघाच्या प्रयत्नातून साकारलेल्या आंबेडकर स्मारकात त्यांच्या पूणार्कृती पुतळ्याचे अनावरण १४ मे रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यादृष्टीने भीमोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्व राजकीय व सामाजिक घटकांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे यशवंत यादव व संजय जाधव यांनी सांगितले.