नारायण राणेंना संसदेत बाके वाजवायला बसवलं का, डॉ.जयेंद्र परूळेकर यांचा सवाल
By अनंत खं.जाधव | Published: June 20, 2024 05:02 PM2024-06-20T17:02:19+5:302024-06-20T17:03:19+5:30
मल्टीस्पेशालिटीची स्वप्न बघण्यापेक्षा रूग्णालये सुधारा
सावंतवाडी : खासदार नारायण राणे यांच्याकडून मंत्रीपद काढून घेऊन मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना फक्त बाक वाजवण्यासाठी सभागृहात बसवल का? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान सावंतवाडी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे गाजर लोकांना दाखवण्यापेक्षा मंत्री दीपक केसरकरांनी आहे ती सरकारी रूग्णालये सुधारावीत, तसेच गणेश चतुर्थी पूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास सुखकर होण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी प्रयत्न करावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
परूळेकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नारायण राणे त्यांच्यासाठी प्रचार सभा घेत तुम्हाला संसदेत बाक वाजवणारा खासदार पाहिजे की, लोकांचे प्रश्न सोडवणारा खासदार? असा सवाल केला होता. मात्र जनतेने विश्वासाने निवडून देऊनही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी राणे यांना बाक वाजवणारा खासदार म्हणून संसदेत ठेवले आहे का? असा सवाल उपस्थित केला.
राणे यांच्याकडील सूक्ष्म लघु व मध्यम हे मंत्रीपद दुसऱ्याला देऊन एक प्रकारे कोकणी जनतेचा अपमान केला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. राणे यांनी खासदारकीचा उपयोग इथल्या जनतेसाठी जनतेचे जीवन सुकर होण्यासाठी करावा. कोकणचा विचार करता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अवैद्य मार्गाकडे युवक चालले आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशिन येऊनही ती कोणाच्या प्रतीक्षेत आहे? ती का सुरू होत नाही? असा सवाल त्यांनी केला.
सत्ताधाऱ्यांचे अपयश
मंत्री केसरकर यांनी मल्टीस्पेशालिटीचे गाजर दाखवण्यापेक्षा आहे त्याच आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा करावी. तसेच कुटीर रुग्णालयात सध्या औषधे मिळत नाहीत. तसेच डॉक्टर कमी अशा परिस्थितीत रूग्ण गोवा, बांबोळी येथे जावे लागत आहेत. हेच सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याचे टीका ही परूळेकर यांनी केली.