धरण अन् नदीवरच पाण्यासाठी भीस्त
By admin | Published: February 9, 2015 01:21 AM2015-02-09T01:21:30+5:302015-02-09T01:21:42+5:30
खेड तालुका : चार धरणांतील पाण्याचा वापरच नसल्याने जनतेचा घसा अद्यापही कोरडाच
श्रीकांत चाळके - खेड -खेड तालुक्यातील पाणीटंचाईपेक्षा पाणी वितरणाची पध्दत पाहिली, तर हा तालुका पाण्याच्या बाबतीत सर्वाधिक श्रीमंत आहे की काय? असा भास होईल. कारण चक्क चार धरणांतील पाण्याचा वापर न करता नातूवाडी धरण आणि जगबुडी नदीवरच अवघा तालुका पोसला जातोय. याचा अर्थ खेड तालुक्यात पाणीटंचाई भासतच नाही, असे नाही. तालुक्यातील चार धरणांतील पाण्याबाबत कुणीच गंभीर नाही.
खेड तालुक्यातील खोपी-पिंपळवाडी येथील डुबी नदीवर १९८३ साली ३ लाख १५ हजार ६३९ दशलक्ष घनमीटर पाणी क्षमतेच्या उभारण्यात आलेल्या धरणात गेली २७ वर्षे मुबलक पाणीसाठा असतानाही केवळ शासनाचे धोरण आणि शेतकऱ्यांची कालव्याबाबतची उदासीनता यामुळे धरणातील मुबलक पाणीसाठा वापराविना पडून असतो. धरणातील पाण्यावर लगतच्या गावांसाठी पाणीयोजना राबवल्यास सुमारे आठ गावांची पाणीटंचाई चुटकीसरशी दूर होऊ शकते. मात्र त्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. गेली २७ वर्षे धरण ‘उशाला’ असतानाही खोपीतील १८ वाड्यांपैकी धनगरवाडी, कुपरेवाडी, रामजीवाडी व जांभिळवाडी या चार वाड्यांतील ग्रामस्थांच्या ‘घशाला’ वर्षानुवर्षे कोरड पडलेली आहे. खोपी - धनगरवाडीतील ग्रामस्थांना तहान भागवण्यासाठी १० किलोमीटरची पायपीट करावी लागते. या वाड्यांतील ग्रामस्थांना पाण्याची चणचण भासू लागली आहे.
गतवर्षी दोन्ही कालव्यांलगतच्या दीड किलोमीटरपर्यंतच्या शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. पाणी उपलब्ध असल्याने उन्हाळी शेती करण्याबाबत प्रबोधन करून शेती करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. मात्र, त्यांनी असमर्थता दाखवल्याने यावर्षीही पुन्हा बैठका घेण्यात येणार आहेत. कालव्याच्या पाण्याबाबत शेतकऱ्यांची उदासीनता कायमच असून, धरणातील पाणी वापराविनाच आहे़
खेड शहरापासून हुंबरी हे गाव सुमाारे २५ किलोमीटर अंतरावर आहे. याच गावामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात वसलेल्या अनेक वस्त्यांपैकी धनगर समाजाची एक वाडी आहे. या वाडीत अवघी ६ घरे आहेत़ त्यांना याअगोदर फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुरेल एवढी पिण्याच्या पाण्याची विहीर होती. मात्र, २००५च्या अतिवृष्टीमध्ये ही विहीर कोसळली. या विहिरीचे पुन्हा बांधकाम न झाल्याने पाण्याची समस्या उद्भवली. येथील २५ ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. या वाडीत पाण्याचा लहानसा पऱ्या आहे. यातील पाणी मार्च महिन्यापर्यंत पुरते. मात्र, यावर्षी हे पाणी फेब्रुवारी महिन्यातच आटले आहे. तेव्हापासून हे ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. वाडी डोंगरावर वसल्याने त्यांना हुंबरी गावात खाली उतरून तेथील विहिरीतील पाणी भरावे लागते. मात्र, डोंगरावरून गावात २ किमी उतरावे लागत असल्याने पाणी घेऊन पुन्हा डोंगर चढणे अशक्य होत असल्याने त्यांना तेथून अडीच किलोमीटर अंतरावर रसळगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवकालीन खांब तलावमधील पाण्याचा उपयोग होत आहे. दररोज एवढे अंतर चालत जाऊन पाण्यासाठी तीन तीन खेपा माराव्या लागत आहेत. त्यांना गावात खाली उतरून पाणी भरता यावे, याकरिता शासनाची वाट न पाहता मोलमजुरीतून साठवलेल्या १ लाख रूपये रकमेतून रस्ता तयार केला होता. मात्र, हा रस्ताही २००५च्या अतिवृष्टीत वाहून गेला असून, त्यांचे १ लाख रूपये पाण्यात गेले आहेत.
ग्रामस्थांनी पाण्याच्या टँकरसाठी प्रस्तावही दाखल केले आहेत़ तरीही तेथील भौगौलिक कारणास्तव टँकर पोहोचू शकत नसल्याने प्रशासनाचा नाईलाज झाला आहे. विशेष बाब म्हणून तालुक्यातील धनगरवाड्यांना वेगळे निकष लावून पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे अपरिहार्य आहे. हीच स्थिती तालुक्यातील न्यू मांडवे, माणी शेलारवाडी, पोयनार या धरणांची आहे. अपुरा निधी आणि राजकीय अनास्था यामुळे तालुक्यातील धनगरवाड्यांची ही स्थिती आहे. धनगरवाड्यावगळता तालुक्यातील इतर गावांतदेखील नद्यांचे पाणी मार्च अखेर आटत असल्याने तालुक्यातील २४ गावांतील ६४ वाड्यांना पाणीपुरवठा करावा लागतो. जगबुडी आणि डुबी या दोन्ही नद्यांसह चोरद नदी गाळाने मोठ्या प्रमाणात भरली आहे. खेड शहरातील खांबतळे हे पूर्णपणे गाळाने भरले आहे. याशिवाय खेड शहराला पाणीपुरवठी करणारे बोरज धरणही गाळाने भरले आहे. निधीअभावी धरणातील गाळउपशाचे काम रखडले आहे. पाण्याचे हे हक्काचे आणि अखंड वाहणारे स्रोत उपलब्ध असताना संबंधित यंत्रणा येथील जनतेला पुरेसा पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे. पावसाळावगळता या नद्यांमधील पाणी वापरू शकत नसल्याची अनेक दिवसांची बोंब आहे. अनेक ग्रामपंचायती पाण्याच्या विजेची बिले भरण्यास असमर्थ आहेत़ विजेअभावी पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. कूपनलिका आणि विहिरींची अपुरी असलेली संख्या विचारात घेता पाणीपुरवठ्यामध्ये अडथळा येत आहे. मार्चअखेर सर्वच जलस्रोत आटत असल्याने पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. धरणे आणि कालव्यांची दुरूस्ती तसेच नद्या व विहिरींतील गाळ उपसा करण्याची आवश्यकता आहे. मात्र, राजकीय अनास्था, ग्रामस्थांची अधुरी इच्छाशक्ती, प्रशासनाची कुचराई अनेक जलस्रोत आटू लागले असल्याचे चित्र आहे.
रस्ताही वाहून गेल्याने संकट
हुंबरी धनगरवाडीत छत्रपतींच्या काळापासूनचे हे पाण्याचे स्रोत आजही तसेच असल्याने तुटपुंजे का होईना, इथल्या लोकांना हा मोठा आधार झाला आहे. मात्र, हे पाणी आणण्यासाठी तयार केलेला रस्ता अतिवृष्टीत वाहून गेल्याने भीषण संकट ओढवले आहे. या वाडीतील ६ घरे आणि २० ग्रामस्थ पाण्यावाचून तडफडत आहेत. वाडीकडे रस्ताच नसल्याने शासनाचा पाण्याचा टँकर जाऊ शकत नाही़ यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे.
धनगरवाड्या तहानलेल्याच
येथील धनगरवाड्या तर अन्य तालुक्यांप्रमाणे तहानलेल्याच असतात. हुंबरी धनगरवाडीच्या पाण्याचा आधारच संपल्याने येथील ग्रामस्थांना घरापासून रसाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या डबक्यापर्यंत पायपीट करावी लागत आहे. खोपी - धनगरवाडी , रामजीवाडी, जांभिळवाडी, कुपरेवाडी, सवेणी- धनगरवाडी, कावळे- धनगरवाडी, कासई- धनगरवाडी, नवानगर, ताठरेवाडी, गोठलवाडी, चांदेवाडी, कुंभाड धनगरवाडी, मिर्ले व बिजघर या वाड्यांना टंचाईची झळ पोहोचते.
जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण
जिल्ह्यातील सर्वांत मोठे असलेले नातूवाडी येथील मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे धरण अगदी तालुक्यातील नातूनगर गावापासून खेड शहरापर्यंत पिण्याचे पाणी पुरवित आहे. याचप्रमाणे खोपी येथील पिंपळवाडी धरण, न्यू मांडवे धरण, पोयनार तसेच माणी शेलारवाडी या धरणात पाणी मुबलक आहे. मात्र, नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची बोंब अनेक वर्षे तशीच आहे.