नाटळ प्रशालेला दहा लाख
By admin | Published: February 5, 2015 08:28 PM2015-02-05T20:28:42+5:302015-02-06T00:39:50+5:30
विनायक राऊत यांची घोषणा : विद्यालयाने केला भावपूर्ण सत्कार
कनेडी : ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था अनेक समस्यांनी त्रस्त असतात. राजवाडी उत्कर्ष मंडळाच्या संचालकांनी अशा समस्यांना तोंड देत सुरू ठेवलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. उच्च माध्यमिक विभाग सुरू करताना संस्थेने काळाची गरज ओळखून व्यवसाय तंत्रशिक्षणाला प्राधान्य दिले, ही समाधानाची बाब आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. या प्रशालेला मदत म्हणून दहा लाख रुपये निधी देण्याची घोषणा त्यांनी केली.नाटळ येथील श्री देव रामेश्वराच्या हरिनाम सप्ताहानिमित्त दर्शनासाठी आलेल्या विनायक राऊत यांनी बुधवारी नाटळ हायस्कूलला भेट दिली. यावेळी संस्था व हायस्कूलच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थाध्यक्ष अशोक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपाध्यक्ष सुरेश सावंत, सचिव राजाराम सावंत, खजिनदार पंढरीनाथ सावंत, शालेय समिती चेअरमन सदानंद सावंत, उच्च माध्यमिकचे चेअरमन महादेव सावंत, सचिव विश्वनाथ सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, उपतालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, रमाकांत सावंत, सोमा घाडीगांवकर, राजू राठोड, संस्था सदस्य राजू सावंत, अंकुश सावंत, सदा सावंत, शामसुंदर सावंत, गोपीनाथ सावंत, सुनील सावंत, स्वप्निल मराठे, संस्था सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.सचिव राजाराम सावंत यांनी, संस्थेच्या गेल्या ३४ वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला. प्रशाला प्रगतीकडे वाटचाल करीत असली तरी काही आर्थिक समस्या तसेच शासनाच्या नियमांमुळे या प्रगतीत अडथळे निर्माण होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. राजाराम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक दत्तात्रय मुंडले यांनी आभार मानले. (वार्ताहर)
राज्यात आता कोकण पॅटर्न
राऊत म्हणाले, लातूर पॅटर्नचा बोलबाला संपला असून, राज्यात आता कोकण पॅटर्न आहे. प्रशालेला भेडसावणाऱ्या संच मान्यता व अन्य समस्यांबाबत आपण शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. कुठलेही मोठे आर्थिक पाठबळ नसताना नाटळसारख्या ग्रामीण भागात एखादी शिक्षण संस्था सुरू करून ती नावारूपास आणणे ही सर्वसाधारण बाब नाही. मात्र, राजवाडी उत्कर्ष मंडळाच्या संचालकांनी व सदस्यांनी सर्व समस्यांवर मात करीत ही प्रशाला जिल्ह्यात नावारूपाला आणली आहे. त्यांची ही वाटचाल निश्चितच प्रेरणादायी आहे.