संघटनेच्या बळावर उद्योगाचे स्वप्न सत्यात

By admin | Published: August 20, 2016 09:10 PM2016-08-20T21:10:16+5:302016-08-20T22:09:48+5:30

परूळेबाजारमधील ‘आदिनारायण’ गटाची किमया : घरकामातून प्रशासनासह बँकिंगमध्ये पारदर्शी कारभार --महिलांचा बचतगट ६४

The dream of the organization is true | संघटनेच्या बळावर उद्योगाचे स्वप्न सत्यात

संघटनेच्या बळावर उद्योगाचे स्वप्न सत्यात

Next

वेंगुर्ले : महिला सक्षमीकरणाच्या चळवळीतून आपणही प्रगती करावी, आणि एखादा आदर्शवत उद्योग उभा करावा, या स्वयंप्रेरणेने जागृत होऊन परुळेबाजार येथील महिलांनी आपले संघटन बांधले. पिढ्यान्पिढ्यांची गरिबी दूर करण्यासाठी दैनंदिन वापरातील वस्तूंची निर्मिती व विक्री करीत त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ‘फिश आॅन व्हील’ ही गाडी खरेदी केली. एकेकाळी संघटित होऊन पाहिलेले उद्योग उभारण्याचे स्वप्न त्यांनी संघटनेच्या जोरावर अल्पावधीतच सत्यात उतरले. ही यशोगाथा आहे परुळेबाजारातील आदिनारायण महिला बचत गटाची.
परुळेबाजार येथील तेरा महिलांनी एकत्र येत आदिनारायण स्वयंसहाय्यता महिला बचत गटाची स्थापना ८ फेब्रुवारी २०१२ रोजी केली. गटातील महिलांनी दरमहा १०० रुपयेप्रमाणे मासिक बचत जमा करून आपल्या दैनंदिन गरजा भागविल्या. बँकेतील पारदर्शी व्यवहारानंतर पंचायत समितीमार्फत प्रथम श्रेणीकरण करण्यात आले. या गटाला २५ हजार रुपयांचे खेळते भांडवल पुरविण्यात आले.
हे कर्ज व्यवस्थित फेडल्यानंतर द्वितीय श्रेणीकरण म्हणून ८० हजार रुपये १५ आॅक्टोबर २०१५ रोजी परुळे बँकेकडून देण्यात आले. पण, मिळालेल्या रकमेतून कायमस्वरूपी नफा मिळवून देणारा उद्योग उभारण्याचा संकल्प या महिलांनी घेतला.
दरम्यान, गटातील सदस्यांनी ‘जनशिक्षण संस्थानतर्फे’ मेणबत्ती बनविणे, साबण तयार करणे, शिवणकाम, आदी प्रशिक्षणासह कुळीथपीठ बनविणे, पापड तयार करणे, लोणची बनविणे यांसारख्या उद्योगांचे प्रशिक्षण घेतले आहे. २००६ पासून २०११ पर्यंत आदिनारायण गटातील महिलांनी शाळेतील मुलांना वैयक्तिकरीत्या (पहिली ते सातवीपर्यंत) पोषण आहार पुरविला. त्यानंतर २०१३ पासून २०१६ पर्यंत आदिनारायण बचत गटामार्फत अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार पुरविला. या गटाने स्वच्छता अभियान, बँक मेळावे, गर्भसंस्कार शिबिर, ग्रामविकास आराखडा, शिवार फेरी या सर्व कार्यक्रमांत हिरिरीने सहभाग दर्शविला आहे.
सद्य:स्थितीला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत इंटेसिव्हमध्ये परुळे गावाची प्राधान्याने निवड झाल्यानंतर गटाने आठवडा बैठक घेऊन अखंडित बचत सुरू केली.
या गटातील महिलांनी व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ८० हजार रुपये कर्ज मंजूर करून त्याची उचल करण्यात आली. बचत गटाकडून नियमितपणे कर्जाची परतफेडही सुरू आहे.
आदिनारायण बचत गटाला २०१६ रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून (सिंधुदुर्ग) ‘फिश आॅन व्हील’ ही गाडी देण्यात आली. या गटाने ही गाडी खरेदी करून या गाडीवर बटाटाभजी, वडापाव असे वेगवेगळे पदार्थ तयार करून विकले. यातून झालेला आर्थिक फायदा आणि वेळेची व शारीरिक श्रमाची बचत यामुळे गटातील महिलांचा व्यवसाय सुस्थितीत झाला.
गाडीची देखभाल दुरुस्ती करून तिचा सर्व कामाला सुयोग्य वापर सुरू आहे. शिवाय आदिनारायण बचत गटातील सदस्य हे स्वच्छता अभियान, स्त्रियांचे आरोग्य व हक्क, गर्भसंस्कार मार्गदर्शन व उपक्रम, गाव विकास आराखडा या सर्व कार्यक्रमात अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग दर्शवितात.
आदिनारायण स्वयंसहाय्यता बचत गटात अध्यक्ष प्रणिती पांडुरंग आंबडपालकर, उपाध्यक्ष सुचिता सूर्यकांत परुळेकर, सचिव शैलजा संजय तोरसकर यांच्यासह सदस्य सानिका सुहास परुळेकर, आरती अरुण मडवळ, अनुसया राघो तोरसकर, नयना सुरेश वेंगुर्लेकर, श्रद्धा नागेश मेस्त्री, रेवती रविकांत परूळेकर, अरुणा अशोक घोगळे, लतिका लवू परब, कविता कमलाकर शिरसाट, शिल्पा दिवाकर परुळेकर, आदींचा समावेश आहे.----
सावळाराम भराडकर

नि:स्वार्थी संघटन आणि पारदर्शी कारभार
आदिनारायण बचत गटाच्या अध्यक्षा प्रणिती आंबडपालकर यांना सरपंच होण्याचा मान प्राप्त झाला. त्यांचा पारदर्शी कारभार आणि समन्वयाचे धोरण पंचायत समितीसह जिल्हा परिषदेतही उठावदारपणे जाणवल्याने आदिनारायण गटाला अशा नि:स्वार्थी संघटनेने नावलौकिक मिळाला.
कायमस्वरूपी रोजगार देण्यावर भर : आंबडपालकर
भविष्यात फळप्रक्रिया, मसाला उद्योग व्यवसाय तसेच काथ्या प्रशिक्षण हे व्यवसाय करण्याची महिलांची इच्छा आहे. तसेच उर्वरित महिलांना कायमस्वरूपी उद्योग सुरू करून देण्यासाठी अल्पावधीतच नूतन उद्योग उभारणार आहोत. नवीन निर्माण झालेल्या बचत गटांना एकत्र घेऊन संघटितपणे काम करण्याचा बचत गटाचा मानस आहे.
- प्रणिती आंबडपालकर, अध्यक्षा,
आदिनारायण महिला बचतगट, परूळेबाजार.

Web Title: The dream of the organization is true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.