‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’वर प्रकाश टाकणारे ‘एका लग्नाचे स्वप्न

By admin | Published: November 26, 2015 09:19 PM2015-11-26T21:19:18+5:302015-11-27T00:14:18+5:30

राज्य नाट्य स्पर्धा : समाजातील स्त्रीभ्रूण हत्या, लैंगिक छळ समस्यांवर उहापोह

'Dreaming of a wedding', highlighting 'Contract Marriage' | ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’वर प्रकाश टाकणारे ‘एका लग्नाचे स्वप्न

‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’वर प्रकाश टाकणारे ‘एका लग्नाचे स्वप्न

Next


रत्नागिरी : समाजातील घटणारी मुलींची संख्या, भविष्यातील भयानक परिस्थिती विचारात घेता शासनाने तयार केलेला ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’ कायदा, यामुळे स्त्रीच्या शरीराचे होणारे व्यवहार किंवा देवाणघेवाण, २० वर्षे सतत दोन वर्षांसाठी करावा लागणारा करार, मात्र, संबंधित कायदा हा स्त्रियांना आयुष्यातून उठविणारा कसा आहे, यावर ‘एका लग्नाचे स्वप्न’ या नाटकाव्दारे राधाकृष्ण कला मंचाच्या कलाकारांनी प्रकाशझोत टाकला. संबंधित नाटकांची संहिता केवळ चार पात्रांवर अवलंबून आहे. कलाकारांनीही सुंदर अभिनय सादर केल्यामुळे प्रेक्षकांना ही कलाकृती भावली. नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत आदी सर्व बाबी नाटकाला साजेशा होत्या. दिग्दर्शनातील नीटनेटकेपणाही भावला.
रागिणी सरदेसाई व राजन सरदेसाई या दाम्पत्याचा दोन वर्षांचा करार असतो. हा करार संपल्यानंतर रागिणी सरदेसाई यांचा दयानंद प्रधान यांच्यासोबत पुन्हा दोन वर्षांचा करार होतो. करार संपल्यानंतर प्रधान रागिणी यांना न्यायला येतो, वकील प्रभा रानडे प्रधान यांच्या समवेत येतात. मात्र, रागिणी व राजन दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघे एकमेकांना सोडून जाण्यास तयार होत नाहीत.
त्याचवेळी रागिणी गरोदर असल्याचे सांगते. वकील त्याबाबतच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करतात, त्यासाठी दोन दिवसांची मुदत देतात. परंतु दोन दिवसांनंतर पुन्हा आलेल्या वकिलांना आपण गरोदर नाही, परंतु आम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याचे सांगतात. त्याचवेळी संबंधित कायदा करणाऱ्या प्रशासनाविषयी राजन आणि रागिणी नाराजी व्यक्त करतात. त्याचवेळी वकील प्रभा रानडे आपणही याच भूमिकेतून गेल्याचे सांगून संबंधित कायदा कोणी, का, कशासाठी संमत केला, याबाबत सांगताना पोटतिडकीने महिलांची व्यथाही स्पष्ट करतात. स्त्रीभ्रूणहत्येमुळे समाजातील घटणारे मुलींचे प्रमाण, मुलगा वंशाचा दिवा मानणारी कुटुंबव्यवस्था, हुंडाबळी, समाजात बलात्काराचे वाढलेले प्रमाण सांगून महिलांची समाजातील असुरक्षितता स्पष्ट केली.
काँट्रॅक्ट मॅरेजप्रमाणे सतत दोन वर्षांचा करार २० वर्षे महिलांना विविध पुरूषांसोबत करावा लागणार आहे. कायद्यानुसार पहिल्या वर्षातच स्त्री गरोदर राहाणे आवश्यक आहे. मात्र, दोन वर्षांचा करार संपल्यानंतर त्या मुलाचा सांभाळ करण्यास कोणताही पुरूष तयार होत नाही. साहजिकच मुलाची रवानगी अनाथाश्रमात करावी लागणार, २० वर्षांनंतर करारातून मुक्त झालेल्या महिलेला आधार कोण देणार? जीवंत राहण्यासाठी पत्कारावा लागणारा वेश्या व्यवसाय अन्यथा आयुष्य संपवण्याचेच पर्याय राहू शकतात. अखेर कराराप्रमाणे रागिणीला प्रधानाकडे जावे लागणार असल्याचे रानडे सांगतात. मात्र, रागिणी विष प्राशन करून जीवनाचा अंत करते.
पूजा देसाई हिने रागिणीची भूमिका सादर करताना महिलांची व्यथा स्पष्ट केली आहे. नाटकाच्या शेवटी ती भयानक स्वप्न पाहात असल्याचे दाखवून नाटकाचा शेवट गोड करण्यात आला. पूर्वा पेठे यांनीही प्रभा रानडेच्या भूमिकेतून संबंधित कायदा अमलात आणण्यामागची कारणेही स्पष्ट केली. दयानंद प्रधानाची भूमिका अभिषेक ढवळे यांनी उत्कृष्टरित्या पेलली.
राजनच्या भूमिकेतून वैनतेय जोशी याने समस्त पुरूषवर्गातील वेगळेपणा दाखवून दिला. संवादामध्ये झालेली घाई आणि प्रकाशयोजनेतील तांत्रिक घोळ वगळल्यास नाटकाचे सुंदर झालेले सादरीकरण प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडून गेले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Dreaming of a wedding', highlighting 'Contract Marriage'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.