चालकानेच रचला दरोड्याचा बनाव
By admin | Published: June 14, 2017 11:50 PM2017-06-14T23:50:52+5:302017-06-14T23:50:52+5:30
चालकानेच रचला दरोड्याचा बनाव
लोकमत न्यूज नेटवर्क
लांजा : महामार्गावर आपली गाडी अडवून दरोडेखोरांनी आपल्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि आपल्याकडील दोन लाख रुपये लुटून नेले, अशी तक्रार करणारा वाहनचालक महेश पालव यानेच दरोड्याचा बनाव रचला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. लांजा पोलीस आणि रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या तपासात ४८ तासांतच हा बनाव उघड झाला आहे.
पालव याने तपासाप्रसंगी लांजा पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी हिसका बसताच पालव याने हा सर्व प्रकार आपणच घडवून आणल्याचे सांगितले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रत्नागिरी येथील जागृत मोटर्स या कंपनीमध्ये महेश अरुण पालव हा गेली पाच वर्षे चालक म्हणून कामाला आहे. दि. ११ जूनला सकाळी ९ वा. कामावर आल्यावर त्याने रत्नागिरी-गवळीवाडा येथील मित्र आप्पा परब याला फोन करून रात्री आठ वाजता लांजा रेस्ट हाऊस येथील पेट्रोलपंपाजवळ बोलावले. पालव दुपारी १.४५ वा रत्नागिरीहून कुडाळकडे निघाला. राजापूर, कुडाळ आणि नंतर कणकवली अशा तीन ठिकाणी जमा झालेले पैसे घेऊन त्याने परतीचा प्रवास सुरू केला.
रात्री आठच्या दरम्यान तो लांजा पेट्रोलपंप येथे आला. आप्पा परब त्याची तेथे वाट पाहत होता. पालवने आप्पा परब याच्याकडे बंद लखोट्यात भरून २ लाख ३६ हजार रुपये दिले. लांजा येथेच एका पानटपरीवर पालवने ब्लेड घेतले आणि तो पुढे निघाला. वेरळ घाट उतरून एक ते दीड किलोमीटर पुढे गेल्यानंतर गाडी थांबविली. खाली उतरून स्वत:च्या अंगावर ब्लेडने उजव्या हातावर व छातीवर वार केले. त्याच्या गाडी मागोमाग मोटारसायकल घेऊन येणाऱ्या आप्पा परब याच्याच मोटारसायकलवर बसून पालव पाली पोलीस ठाण्यात पोहचला व बनाव रचलेली कथित कथा सांगितली आणि पाली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला.
या घटनेची दखल घेत लांजा पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी आपले कर्मचारी घेऊन पाली गाठली. त्यांनी वरिष्ठांना याची कल्पना दिल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रणव अशोक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी तेथे भेट देऊन मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास गावडे यांनी लगेचच तपास सुरू केला. गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक शिरीष ससाणे व त्यांचे पथकही आपल्या पद्धतीने तपासात सक्रिय झाले.
पालव याच्या जबानीतील विसंगतीमुळे हा बनाव पोलिसांनी चाणाक्षपणे उघड केला. आता याबाबतची पुढील कार्यवाही लांजा पोलिसांनी हाती घेतली आहे.
यामुळेच पोलिसांना आला संशय
महेश पालव याने दिलेल्या जबाबात काही विसंगती होत्या. त्याच्या हातावर व छातीवर झालेले वार चाकूचे नसून ते ब्लेडचे आहेत. ते वार खोलवर नाहीत, असे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले होते. गाडीच्या दरवाजात पडलेले रक्त, मुंबई-गोवा महामार्गावर ८.३० च्या दरम्यान असलेली वर्दळ अशा अनेक गोष्टींमुळे पोलिसांची संशयाची सुई महेश पालव याच्यावरच होती.