बिबट्याची माणिक डोहकडे रवानगी
By admin | Published: November 23, 2015 11:57 PM2015-11-23T23:57:24+5:302015-11-24T00:20:19+5:30
धामणवणेमध्ये जेरबंद : रविवारी मध्यरात्री केली फासकीतून सुटका
चिपळूण : धामणवणे विठलाई मंदिर परिसरात रविवारी रात्री फासकीत सापडलेल्या बिबट्याची सुटका केल्यानंतर उपचारासाठी पुण्यातील बिबट्या निवारण केंद्र माणिकडोह येथे सोमवारी सायंकाळी पाठविण्यात आले.
रविवारी रात्री विठलाई मंदिर परिसरात नंदकुमार जयराम शेंबेकर यांच्या बागेत लावलेल्या फासकीत अडीच ते तीन वर्षे वयोगटाचा बिबट्या अडकला. याबाबत मनोज भाटवडेकर यांच्या माहितीनुसार, वनखात्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत अंधार झाला होता. घटनास्थळी जाण्यासाठी पायवाट होती.
विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी गोविंद कोल्हे, वनपाल नाईक, वनरक्षक महादेव पाटील, उमेश आखाडे, रामदास खोत, जितेंद्र बारशिंगे, सुरज तेली यांनी पिंजऱ्यासह घटनास्थळ गाठले. रात्री उशिरा फासकीतून बिबट्याची सुटका करण्यात आली. डॉ. जंगले यांनी बिबट्याला बेशुद्ध केले.
शुद्धीत आल्यानंतर
पहाटे बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्याला स्वत: उठून चालता येत नव्हते म्हणून डॉ. जंगले यांच्याकडून पुन्हा उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला सायंकाळी माणिकडोह (जुन्नर) येथे पाठविण्यात आले.
चिपळूण तालुक्यात सध्या बिबट्यांची संख्या कमालीची वाढली आहे. ग्रामीण भागात बिबट्याने जनावरांना मारल्याच्या घटना अनेक आहेत. राजरोस अनेकांना बिबट्याचे दर्शन घडत असते. वनखात्याने त्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)