कॅन्सर, ट्यूमरसारख्या तीनशे आजारांवर प्रभावी औषधाचा शोध
By admin | Published: April 5, 2016 11:22 PM2016-04-05T23:22:30+5:302016-04-06T00:03:36+5:30
राजीव गांधी सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्रतर्फे सुरू करण्यात आलेल्या अभ्यास मोहिमेची सुरुवात दीड वर्षापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातून सुरू करण्यात आली होती.
आकाश शिर्के -- रत्नागिरी --महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील सागरी अपृष्ठवंशीय प्राण्यांची सूची व जैविक पूर्वेक्षणअंतर्गत स्पॉन्जेस व संबंधित सूक्ष्म जीवांच्या विशेष अभ्यास या मोहिमेतून आजवर स्पॉन्जेसच्या २० जाती ओळखण्यात यश आले आहे. भविष्यात याच स्पॉन्जेसच्या विविध जातीपासून अॅन्टी कॅन्सर व अॅन्टी ट्यूमरप्रमाणेच ३०० रोगांना प्रतिकार करणारे औषधी जैविक घटक मिळवण्यात यश आले आहे, अशा कॅन्सरसारख्या जीवघेण्या रोगांवर मात करण्यासाठी हे घटक नवसंजिवनी ठरणार असल्याची माहिती या प्रकल्पाच्या मुख्य संशोधक स्वप्नजा मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राजीव गांधी सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र जनकु कोष हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जानेवारी २0१४मध्ये कार्यान्वित झाला. त्याचा एक भाग म्हणून मत्स्य महाविद्यालयाला ७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या शोधमोहिमेत रत्नागिरी सागरी किनाऱ्यांवरील वायंगणी, आरे-वारे, आंबोळगड, उंडी, वरवडे, मिऱ्या, अलावा, पूर्णगड, कशेळी, भंडारपुळे, या दहा किनारपट्टीचा भागात स्पॉन्जेसची मोठी विविधता मिळून आली.त्यामुळे या प्राथमिक सर्वेक्षणानंतर या किनारी भांगामध्ये संशोधन करून स्पॉन्जेसच्या २0 प्रजाती ओळखण्यात यश आले. दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या शोधमोहीमेतून मिळालेल्या स्पॉन्जेसमधील जैविक घटक तसेच त्याच्यासोबत आढळणाऱ्या शैवाळ, कवक व इतर सूक्ष्म जीवाच्या प्रजाती ओळखण्याचे व ते वेगळे करण्याचे संशोधन युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. यासाठी पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, एज्युकेशन अॅण्ड रिसर्च तसेच नॅशनल सेल कल्चर सायन्स या संस्थांची मदत घेण्यात येत आहे. या संशोधनातून मिळणाऱ्या जैविक घटक भविष्यात विविध रोगांवर औषधे तयार करण्यासाठी संजिवनीचे काम करतील, अशी माहिती मोहिते यांनी दिली.
स्पॉन्जेसच्या माध्यमातून मिळणाऱ्या या जैविक घटकांचा उपयोग हा अॅन्टी कॅन्सर, ट्युमर, त्याचबरोबर ३00 रोगांवर मात करण्यासाठी औषधे तयार करण्यासाठी होणार आहे. या मोहिमेसाठी मत्स्य महाविद्यालयाला ७७ कोटीचा निधी मंंजूर झाला होता. त्यातील सुमारे २२ लाख निधी महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. या मोहिमेचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी राजीव गांधी सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर याचा महत्त्वाचा सहभाग आहे. या प्रकल्पाच्या मुख्य सशोधक डॉ. स्वप्नजा मोहिते, वरिष्ठ संशोधक सहाय्यक पूजा साळवी, श्री बहर महाकाळ, ऋ षीकेश भाटकर तसेच क्षेत्र सहाय्यक कुणाल बारगोडे यांचे योगदान आहे. हा प्रकल्प पाच वर्षांच्या कालावधीचा असून, याव्दारे महाराष्ट्रातील स्पॉन्जेस व इतर अपृष्ठवंशीय सजीव वनस्पतींचा अभ्यास करण्यात येणार आहे.
राजीव गांधी सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्रतर्फे सुरू करण्यात आलेल्या अभ्यास मोहिमेची सुरुवात दीड वर्षापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातून सुरू करण्यात आली होती. त्यावेळी रत्नागिरी सागरी किनाऱ्यावर प्राथमिक सर्वेक्षण करून, आरे-वारे, वायंगणी, आंबोळगड, उंडी, वरवडे, पूर्णगड, कशेळी, भंडारपुळे या १० किनारपट्ट्यांची निवड करण्यात आली.