पाणी उशाला अन् कोरड घशाला
By admin | Published: May 17, 2016 10:34 PM2016-05-17T22:34:04+5:302016-05-18T00:07:24+5:30
टंचाईची कामे ठप्पच : यांत्रिकी विभागाचा ढिसाळ कारभार; पाणीपुरवठा मंत्र्यांकडे लवकरच तक्रार
वेंगुर्ले : खानोली-राऊळवाडी येथे २०१४-१५ मध्ये राष्ट्रीय पेयजल योेजनेखालील विहिरीवर लाखो रुपये खर्च केले. आणि त्या विहिरींना भरपूर पाणी असूनही त्याचे पाणी ग्रामस्थांना मिळत नाही. याबाबत ग्रामस्थांनी जानेवारी महिन्यात तक्रार करुनही अद्यापही त्याची दखल जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाने घेतली नाही. त्यामुळे पाणी उशाला अन कोरड घशाला अशी ग्रामस्थांची अवस्था झाली आहे. भाजपच्या कार्यालयात पाणीटंचाई संदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी १६ एप्रिलला पाणीटंचाईचा पहिला आराखडा मंजूर करून एक महिना उलटला तरी टंचाईची कामे सुरु नाहीत. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पाणीटंचाई निवारण्यासाठी निधी देऊनसुद्धा कामे होत नसल्याचा आरोप देसाई यांनी केला. पाणी टंचाईच्या दुसऱ्या आराखड्यात जिल्ह्यातील २७ विंधन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. परंतु आजपर्यंत एकाही विंधन विहिरीची खुदाई सुरु झालेली नाही. ३० एप्रिलला जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाने बोअरवेल मारणाऱ्या धरणी बोअरवेल कासार्डे, गणेश बोअरवेल जयसिंगपूर, एस. पी. बोअरवेल कणकवली यांना कार्यारंभ आदेश दिलेले होते. परंतु अद्यापही या चारही कंपन्यांनी कामे सुरु न केल्याने त्यांना यांत्रिकी उपविभागातर्फे नोटिसी काढल्याची माहिती देसाई यांनी दिली. एकीकडे पालकमंत्री केसरकर हे जिल्ह्यातील लोकांना पाणी टंचाईतून मुक्तता मिळावी म्हणून टंचाई आराखड्यांना मंजुरी देत आहेत. परंतु त्यांच्याच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना दिसत आहेत. पालकमंत्री केसरकर यांच्याकडे ग्रामविकासासारखे खाते असताना त्यांच्याच अखत्यारीत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून पाणीटंचाई आराखड्याचा बोजवारा उडाला आहे. याबाबत पालकमंत्री केसरकर यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.शासन पाणीटंचाई निवारण्यासाठी वेगवेगळे उपयायोजना करीत असून निधीची तरतूद करीत आहे. परंतू अधिकारी व कर्मचारी यांच्या नाकर्तेपणामुळे त्याचप्रमाणे कंत्राटदाराबरोबर असलेल्या साटेलोट्यामुळे शासकीय योजनांची बदनामी होत आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीतर्फे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोेणीकर यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.वेंगुर्लेतील ३० ग्रामपंचायतीनी १५० कामे अंदाजपत्रकासाठी प्रस्तावित केली आहे. परंतु ग्रामीण पुरवठा विभागाचे वेंंगुर्ले येथील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे अंदाजपत्रके वेळेवर न मिळाल्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीची १० टक्केही कामे झाली नाहीत. त्याचा परिणामही पाणी टंचाईवर झाल्याचे देसाई यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत, सरचिटणीस प्रशांत खानोलकर, रविंद्र शिरसाठ, युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष हितेश धुरी, सुहास गवंडळकर, विनय गोगटे, बाळू प्रभू, आबा धोंड, सुनिल घाग, दीपक माडकर, शामसुंदर मुननकर, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘त्या’ ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
पाणी टंंचाईसारख्या कामात ठेकेदार हेळसांड करत असतील व त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला होत असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या ठेकेदारावर व संबंधित अधिकारी यांच्यावर राहील. अशा ठेकेदारांना शासनाने काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही देसाई करणार आहेत.