शासनाच्या निर्णयामुळे काजू शेतकऱ्यांना दिलासा, अमित आवटे यांची प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:11 AM2019-06-21T11:11:51+5:302019-06-21T11:14:06+5:30
राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये काजू प्रक्रिया उद्योगासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केली आहे. शासनाचा हा निर्णय चांगला असून त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील काजू प्रक्रिया उद्योजकांना आणि पर्यायाने काजू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कॅश्यु फेडरेशनचे उपाध्यक्ष अमित आवटे यांनी दिली आहे.
कणकवली : राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये काजू प्रक्रिया उद्योगासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केली आहे. शासनाचा हा निर्णय चांगला असून त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील काजू प्रक्रिया उद्योजकांना आणि पर्यायाने काजू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कॅश्यु फेडरेशनचे उपाध्यक्ष अमित आवटे यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेली काही वर्षे आजारी अवस्थेकडे जाणारा काजू प्रक्रिया उद्योग हा विविध कारणांनी ग्रासलेला होता. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारात काजूची झालेली घसरण हे त्याचे मुख्य कारण होते. मागीलवर्षीच झालेली काजू पीक विकास परिषदेची स्थापना ही अर्थमंत्र्यांच्या सूचनेने झाली होती. त्या परिषदेचे अध्यक्ष गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल काजू व्यवसायाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कारणीभूत ठरला आहे.
सिंधुदुर्ग भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर हे काजू पीक विकास परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी १५ आॅगस्ट २०१८ रोजी जिल्हा बँकेच्या प्रधान शाखेत ओरोस येथे काजू प्रक्रिया उद्योग कारखानदार आणि शेतकरी यांची पहिली संयुक्त बैठक घेऊन या व्यवसायाच्या पुनरुत्थानासाठी प्रयत्न सुरू केला होता. तसेच कृषी विद्यापीठ दापोली येथे जाऊन तज्ज्ञ मंडळींशी सल्लामसलत केली होती.
प्रत्यक्षरित्या खेड्यापाड्यातील सत्तर ते ऐंशी हजार महिलांना रोजगार मिळवून देणारा हा उद्योग अप्रत्यक्षात सुमारे २,००,००० लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. त्यामुळे हा उद्योग वाचवण्यासाठी भरीव तरतुदींची अत्यावश्यकता होती. हे अतुल काळसेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संवेदनशीलपणे जाणून अर्थमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना काही उपाययोजना सुचविल्या होत्या.
त्यामध्ये प्रामुख्याने जीएसटी परतावा सुरू करणे, व्हॅट परताव्यातील थकीत रक्कम परत मिळावी, बँकांकडून व्याजाची सवलत, कर्जाची पुनर्रचना, वस्त्रोद्योग धोरणाप्रमाणे काजू उद्योगासाठी योजना, सवलतीच्या दरात वीज पुरवठा, काजू बोंडूवर प्रक्रिया करून इथेनॉल किंवा सिएनजी निर्मितीसाठी पथदर्शी प्रकल्प, कोकणासाठी काजूचा ब्रँड विकसित करणे अशा अनेक महत्त्वपूर्ण मागण्या काळसेकर यांनी सातत्याने केल्या होत्या. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे, असेही आवटे यांनी म्हटले आहे.
मंत्री, नेत्यांचे आभार
या निर्णयाबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, भाजपा नेते अतुल काळसेकर यांचे आम्ही आभार मानतो, असेही अमित आवटे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.