वैभववाडीत ओला दुष्काळासारखी स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 05:55 PM2017-10-01T17:55:14+5:302017-10-01T18:00:17+5:30
गेला आठवडाभर कोसळणा-या मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या काही भागात हातातोंडाशी आलेली भातशेती नष्ट झाली आहे. शुक्रवारी भुईबावडा परिसरात झालेल्या ढगफूटीच्या महापूरात मोठ्या प्रमाणावर भातशेती वाहून गेली आहे. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य स्थिती पहायला मिळत आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणा त्याची दखल घ्यायला तयार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
प्रकाश काळे
वैभववाडी दि. ०१: गेला आठवडाभर कोसळणा-या मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या काही भागात हातातोंडाशी आलेली भातशेती नष्ट झाली आहे.
शुक्रवारी भुईबावडा परिसरात झालेल्या ढगफूटीच्या महापूरात मोठ्या प्रमाणावर भातशेती वाहून गेली आहे. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य स्थिती पहायला मिळत आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणा त्याची दखल घ्यायला तयार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यातील पन्नास टक्के भातशेती कापणीलायक झाली आहे. परंतु, गेला आठवडाभर दररोज दुपारनंतर कमी अधिक प्रमाणात तालुक्याच्या सर्व भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला आहे. शुक्रवारी भुईबावडा पंचक्रोशीत ढगफूटी होऊन नद्या नाल्यांना रेकॉर्डब्रेक महापूर आला होता. त्या महापुराने नदी नाल्याकठची भातशेती अक्षरशः धुवून नेली आहे. तर ब-याच ठिकाणी महापुरात दगडगोट्यांसह वाहून आलेल्या गाळाने संपुर्ण भातशेती जमीनदोस्त केली आहे.
शुक्रवारच्या ढगफूटीमुळे भुईबावडा आंबेवाडीतील शेवंती वसंत मोरे, सुंदरा सुरेश मोरे, अहिल्या रघुनाथ मोरे, महेश मनोहर पाटणे, अरविंद जयसिंग मोरे, सुनीतेश रघुनाथ मोरे, नितीन निवृत्ती मोरे, अभय चंद्रकांत पाटणे यांची भातशेती पाण्याखाली जाऊन घराच्या दरवाजाला पुराचे पाणी लागले होते. तर दत्ताराम मोरे यांची नाचणी, संतोष पाटणे यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. तसेच अरविंद मोरे यांची विहीर कोसळली आहे.
तसेच कुसुर मळेवाडी येथील पुलावरुन पाणी गेले. त्यामुळे संतोष साळुंखे, प्रकाश साळुंखे यांच्या घरात पाणी घुसले होते. तर रामेश्वर-दारुबाई मंदिराची चिरेबंदी संरक्षक भींत आणि खडकवाडी येथील गणपती विसर्जन घाट महापुरात वाहून गेला. या महापुराच्या तडाख्यात झालेल्या नुकसानीचा गेल्या तीन दिवसांत पंचनामाही झालेला नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आह
पर्जन्यमापन सदोष?
वैभववाडी तालुक्यात पडणारा पाऊस मोजण्यासाठी यावर्षी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्यात आली आहे. गेले काही दिवस सातत्याने दोन-तीन तास मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र पावसाची तीव्रता आणि कालावधी जवळपास सारखा असूनही पावसाच्या आकडेवारीत कमालीची तफावत आढळून येते. शुक्रवारी भुईबावडा पंचक्रोशीत जी ढगफूटी झाली. तो पाऊस वैभववाडीत नव्हता. त्याची नोंद 80 मिलीमीटर झाली.
जवळपास तेवढाच पाऊस शनिवारी वैभववाडी परिसरात झाला. मात्र, शनिवारच्या पावसाची केवळ 30 मिलीमीटर एवढी नोंद महसूलकडे आहे. ही तफावत वारंवार जाणवत असल्यानेआपदग्रस्तांना नुकसान भरपाईसाठी त्याचा फटका बसत आहे.