माजी उपसरपंचांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू
By admin | Published: August 6, 2015 11:18 PM2015-08-06T23:18:38+5:302015-08-06T23:18:38+5:30
इन्सुलीतील घटना : पंचक्रोशीत शोक
बांदा : सावंतवाडी तालुका पाणलोट सचिव समितीचे अध्यक्ष व इन्सुलीचे माजी उपसरपंच प्रसाद ऊर्फ बंड्या नामदेव पालव (वय ३५, रा. इन्सुली-डोबाशेळ) यांचा बुधवारी सायंकाळच्या सुमारास बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी स्थानिकांनी बंधाऱ्याच्या पाण्यात शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. इन्सुली पाणलोट समितीचे सचिव म्हणून ते कार्यभार पाहत होते. बुधवारी इन्सुली परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने पाणलोट समितीच्यावतीने इन्सुली-आंब्याचे गाळू येथे बांधण्यात आलेला बंधारा ओव्हर फ्लो झाला होता. या बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी ते सायंकाळी त्याठिकाणी गेले होते. बंधाऱ्यावरून पाहणी करताना त्यांचा पाय घसरल्याने ते बंधाऱ्यात कोसळले. बंधारा तब्बल पंधरा ते वीस फूट खोल असल्याने तसेच तुडुंब भरला असल्याने ते बंधाऱ्याच्या पाण्यात गटांगळया खाऊ लागले. याठिकाणी वस्ती नसल्याने प्रसाद पालव हे बंधाऱ्याच्या पाण्यात बुडाल्याचे प्रथम कोणाला समजले नाही.
प्रसाद पालव यांची मोटारसायकल बंधाऱ्यावर असल्याचे काही युवकांनी पाहिले. त्यानंतर ते पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर बंधाऱ्याच्या पाण्यात शोधाशोध करण्यात आली. गुरुवारी पहाटे सहा वाजता त्यांचा मृतदेह सापडला. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत करिहोळी यांनी शवविच्छेदन केले.
प्रसाद पालव हे समाजकार्यात नेहमीच सक्रिय असायचे. काँग्रेसचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी अडीच वर्षे उपसरपंचपद भूषविले. दोन दिवसांपूर्वीचत्यांनी पदभार सोडला होता. उपसरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ जनतेला करून दिला होता.
गुरुवारी सकाळी बंधाऱ्यात मृतदेह शोध मोहिमेत गावातील विकी केरकर, बाबू तावडे, अरुण पालव, स्वागत नाटेकर, महेंद्र्र सावंत, महेंद्र पालव, दीपक सावंत, सुनील सावंत, मिलिंद राऊळ, शिवाजी सावंत, पुरुषोत्तम सावंत, संजय पालव यांनी सहभाग घेतला. शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, माजी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, पंचायत समिती सदस्य बबन राणे, माजी सरपंच नीता राणे यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. महेंद्र पालव यांनी बांदा पोलीस ठाण्यात माहिती दिली, असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रसाद पालव यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहीण, वहिनी असा परिवार आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नंदू पालव यांचे ते कनिष्ठ बंधू होत. (प्रतिनिधी)
अणसूर येथील महिलेचा नदीत बुडून मृत्यू
वेंगुर्ले : अणसूर येथील द्रौपदी अर्जुन गावडे (वय ८०) या वृद्ध महिलेचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ही महिला सकाळी ९ वाजता नदीकडे प्रात:विधीला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. परंतु, दुपारी दीड वाजेपर्यंत ती न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दुपारी अडीचच्या सुमारास तिचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आला. याबाबत तिचा मुलगा बाळकृष्ण अर्जुन गावडे याने पोलिसांत माहिती दिली.