मालवणजवळील मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू
By admin | Published: June 20, 2017 06:55 PM2017-06-20T18:55:17+5:302017-06-20T18:55:17+5:30
मासे पाहण्यासाठी गेला असता दुर्घटना
आॅनलाईन लोकमत
मालवण, दि. २0 : विहिरीतील मासे पाहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. मालवणजवळील मेढा येथे ही दुर्घटना घडली. आनंद रुद्राप्पा गौडर असे या मुलाचे नाव आहे.
मूळ कर्नाटकातील विजापूर येथील गौडर कुटूंबाचे सध्या मेढा येथे वास्तव्य आहे. सकाळी आनंद घरात दिसत नसल्याचे लक्षात येताच आई, बहिणीने त्याचा शोध घेतला. वीस मिनिटांनी योगेश मुळेकर या तरुणाला आनंद जवळच्या विहिरीत आढळला.
योगेशने त्याला विहिरीबाहेर काढले, परंतु त्यावेळी तो बेशुध्दावस्थेत होता. त्याला महेश गिरकर याने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आनंद मालवण येथील टोपीवाला हायस्कूलचा विद्यार्थी होता. त्याचे आई वडील मोलमजूरी करत होते. गौडर कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी गर्दी केली होती.