अटकेच्या भीतीने कुऱ्हेकर फरार
By admin | Published: September 11, 2015 10:51 PM2015-09-11T22:51:59+5:302015-09-11T23:24:53+5:30
बलात्कार प्रकरण
दापोली : बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला दापोलीतील कृषी विद्यापीठाचा सहायक प्राध्यापक एस. पी. कुऱ्हेकर फरार झाला आहे. त्याला अटक करण्यासाठी दापोली पोलिसांचे पथक कर्जत येथे गेले होते. मात्र, तो फरार झाला असल्याने त्यांना हात हलवत परत यावे लागले.येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक एस. पी. कुऱ्हेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. मात्र, अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने प्रा. कुऱ्हेकर याच्याविरोधात मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार प्रा. कुऱ्हेकरवर भा.दं.वि. ३५४ व ५७६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. प्रा. कुऱ्हेकरवर गुन्हा दाखल होण्यापूर्वीच दुपारी दापोली पोलिसांचे पथक कर्जत येथे रवाना झाले होते. या पथकाने कर्जत येथील भात संशोधन केंद्रावर जाऊन प्रा. कुऱ्हेकर याला अटक करण्याची तयारी केली होती. (वार्ताहर)
हितचिंतकांकडून खबर--दापोलीमधूनच प्रा. कुऱ्हेकरच्या हितचिंतकांनी पोलीस निघाल्याची खबर त्याच्यापर्यंत पोहोचवल्याने त्याने पोबारा केल्याचा संशय पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान प्रा. कुऱ्हेकरने पोबारा केल्याने तो अटकपूर्व जामीनसाठी हालचाल करण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.