‘गुरूप्रसाद’मुळे एडस्ग्रस्तांना सन्मानाचे जीवन
By admin | Published: November 30, 2015 09:41 PM2015-11-30T21:41:49+5:302015-12-01T00:22:33+5:30
रूग्णांना सन्मानाची वागणूक : जिल्ह्यातील २१४५ जणांना विविध सोयीसुविधांचा लाभ--जागतिक एड्स दिन
शोभना कांबळे-- रत्नागिरी -एचआयव्हीग्रस्त व्यक्तींकडे आता सहानुभूतीने बघितले जाते. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता बहुसंख्य रूग्ण सन्मानाने जगत आहेत. मात्र, एक काळ असा होता की, या रूग्णांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन अतिशय प्रतिकूल असा होता. याच काळात या रूग्णांसाठी सहायभूत ठरलेल्या येथील ‘गुरूप्रसाद’ संस्थेने गेल्या ११ वर्षात २१४५ संसर्गित व्यक्तिंना वेगवेगळ्या सेवासुविधांचा लाभ मिळवून दिला आहे. विविध समाजसेवी संस्थांच्या मदतीने आर्थिक मदत करून त्यांचे भविष्य उंचावण्यास मदत केली आहे.
पूर्वी एड्सग्रस्तांकडे संशयाने पाहिले जायचे. घरच्यांकडून अशा रूग्णांना उपेक्षित जीवन जगावे लागत असे. त्यांना मदत करण्याच्या हेतूने डॉ. देवदत्त गोरे यांनी रत्नागिरीत ५ आॅगस्ट २००४ रोजी गुरूप्रसाद संस्थेची स्थापना केली.
प्रारंभी डॉ. गोरे यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले होते. अनेक प्रकल्पांसाठी डॉ. गोरे यांना त्यांच्या पत्नी तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या इतर काही व्यक्तीचे सहकार्य लाभले.
डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांतून या संस्थेला पहिलाच ‘ड्रॉप इन सेंटर’ हा प्रकल्प मिळाला. त्यानंतर अव्हर्ट सोसायटी, महाराष्ट्र शासन आणि सध्याचा अलायन्स सी. एस. सी. (एनएमपी+) या प्रकल्पाच्या माध्यमातून ही संस्था एच. आय. व्ही. संसर्गित व्यक्तींकरिता गेली ११ वर्षे कार्य करीत आहे.
काही वर्षांपूर्वी डॉ. गोरे यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी संस्थेची जबाबदारी उचचली. संस्थेतर्फे संसर्गित व्यक्तिंना समुपदेशन, आर्थिक, शैक्षणिक मदत, पौष्टिक आहार याचबरोबर शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. आतापर्यंत संस्थेने तब्बल २१४५ सभासदांना शासनाच्या योजनांचा तसेच इतर सेवासुविधांचा लाभ मिळवून दिला आहे. विधवा आणि गरजू महिलांना रोजगार प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे. अनेक महिला आज विविध व्यवसाय करून त्यावर उदरनिर्वाह करीत आहेत.
आज एचआयव्हीग्रस्तांना ‘गुरूप्रसाद’ संस्थेच्या मदतीचा हात मिळत आहे. सभासदांच्या संख्येत वाढ होत असल्याने संस्थेला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, तरीही ही संस्था या रूग्णांसाठी आधारवड म्हणून काम करीत आहे. या संस्थेचा भक्कम आधार वाटू लागला आहे.
योग्य समुपदेशन झाल्यामुळेच आज समाजाचा एड्सरूग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदलला आहे. त्यामुळे आता अपवाद वगळले तर घरातील मंडळी या रूग्णांना स्वीकारून त्यांना आधार देऊ लागली आहेत.
- प्रेरणा गोवेकर,
व्यवस्थापिका, गुरूप्रसाद ट्रस्ट