उधाणाच्या महाकाय लाटांमुळे देवगड किनाऱ्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 02:41 PM2018-07-14T14:41:36+5:302018-07-14T14:52:03+5:30
अमावास्येच्या पहिल्याच उधाणाच्या महाकाय लाटांमुळे पाण्याने देवगड किनारा गिळंकृत केला आहे. यंंदाच्या पावसाळ्यात सर्वात मोठी भरती व लाटांचे उधाण सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पहायला मिळाले. ४ मीटर उंचीच्या लाटा किनारपट्टीवर आदळत असल्याने वाळूची मोठी धूप झाली आहे.
देवगड : अमावास्येच्या पहिल्याच उधाणाच्या महाकाय लाटांमुळे पाण्याने देवगड किनारा गिळंकृत केला आहे. यंंदाच्या पावसाळ्यात सर्वात मोठी भरती व लाटांचे उधाण सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पहायला मिळाले. ४ मीटर उंचीच्या लाटा किनारपट्टीवर आदळत असल्याने वाळूची मोठी धूप झाली आहे.
वेळ जसा पुढे सरकत होता तसा लाटांचा जोर वाढत होता. उत्साही पर्यटकांनी फेसाळलेल्या लाटा अंगावर घेत आनंद लुटला. पावसाच्या सरी कोसळत असताना दुसरीकडे समुद्राच्या पाण्यात भिजण्याचा मोह पर्यटकांसह स्थानिकांना आवरता आला नाही.
उधाणाच्या सुमारे चार मीटर उंचीच्या लाटा उसळलेल्या पहावयास मिळाल्या. या लाटा पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनीही देवगड समुद्रकिनारी गर्दी केली होती.
उंच उसळणाऱ्या लाटांमुळे समुद्राने रौद्र रूप धारण केल्याचे दिसत होते. उधाण मोठे असल्याने समुद्रातील पाणी संरक्षक कठड्यांच्या बाहेर आल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले.