अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीस अडचणी, कुडाळ तालुक्यातील शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 11:38 AM2019-03-22T11:38:12+5:302019-03-22T11:42:57+5:30
कुडाळ तालुक्यातील कडावल परिसरातील उन्हाळी शेती बहरात आली आहे. मात्र ग्रामीण भागात अनेकदा होणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यात अडथळा येत असून त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत.
सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील कडावल परिसरातील उन्हाळी शेती बहरात आली आहे. मात्र ग्रामीण भागात अनेकदा होणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यात अडथळा येत असून त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत.
परिसरातील शेतकरी प्रतिवर्षी विविध प्रकारची उन्हाळी पिके घेतात. विशेषत: भुईमूग, नाचणी, चवळी, कुळीथ, मका तसेच भाजीपाल्याची इतर पिके घेण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल आहे. खरीप भात कापणीची कामगत पूर्ण झाल्यानंतर यंदाही येथील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिके घेतली आहेत.
पूर्वी विहिरींवर लाट घालून शेतकरी उन्हाळी शेतीला पाणी पुरवठा करत असत. कालांतराने बहुतांश शेतकऱ्यांनी विहिरींवर विद्युत पंप बसवून सिंचनास सुरवात केली. विहिरींवरील लाट आता इतिहासजमा झाली आहे. विद्युत पंपामुळे शेतीला पाणीपुरवठा जलद होऊ लागला. लाट काढण्यासाठी लागणारे शेतकऱ्यांचे श्रमही वाचले. मात्र अनियमित वीज पुरवठ्यामुळे विद्युत पंपधारक शेतकरी यंदा मात्र अडचणीत सापडले आहेत.
बहुतांश विद्युत पंपाना तीन फेज पॉवर लागते . तीनपैकी एक विद्युतलाईन बंद असली तर पंप सुरू होत नाही. मात्र अनेकदा तीन पैकी एक किंवा दोन विद्युत लाईन बंद असतात. काही वेळा तर संपूर्ण वीज पुरवठाच बंद असतो. त्यामुळे विद्युत पंपही बंद ठेवावे लागत आहेत. सध्या उन्हाळी पिके ऐन बहरात आहेत. अशा अवस्थेतच अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.