प्रशासनावर अंकुश नसल्याने विकास ठप्प
By admin | Published: December 23, 2014 12:35 AM2014-12-23T00:35:05+5:302014-12-23T00:35:05+5:30
कणकवली नगरपंचायत : विरोधी नगरसेवकांचा आरोप
कणकवली : कणकवली शहरातील अनेक विकासकामे रखडली असून नागरिकांना त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. घरपट्टी वाढीचा निर्णय घेणारे सत्ताधारी जनतेच्या सुविधांमध्ये वाढ करणार का? असा प्रश्न उपस्थित करतानाच नगराध्यक्षा तसेच सत्ताधाऱ्यांचा नगरपंचायत प्रशासनावर अंकुश नसल्यानेच कारभारात ताळमेळ नसल्याची टिका विरोधी नगरसेवक सुशांत नाईक व राजश्री धुमाळे यांनी केली आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार सोमवारी अवधूत तावडे यांनी स्वीकारला. नवनियुक्त मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत विरोधी नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यानंतर या नगरसेवकांनी नगरपंचायत कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगरसेविका नंदिनी धुमाळे उपस्थित होत्या.
सुशांत नाईक व राजश्री धुमाळे म्हणाले, नगरपंचायतीकडून शहरातील घरपट्टी वाढविण्यात येणार आहे. मात्र शहरातील नागरिकांना अपुऱ्या सुविधा मिळत आहेत. या सुविधांमध्ये घरपट्टी वाढीनंतर वाढ होणार का? हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे.
नगरसेवक रूपेश नार्वेकर यांनी आपल्या घरासमोरील दगडी कुंपण हटवून पुन्हा त्याच ठिकाणी बांधले आहे. रस्त्यासाठी जागा सोडल्याचे त्यांनी नाटक केले आहे, असा आरोप करतानाच विरोधी नगरसेवक म्हणाले की, सत्ताधारी नगरसेवक प्रशासनाला विकासकामांसाठी सहकार्य करीत नसतील तर इतरांनी तरी का करावे? असा प्रश्न निर्माण होतो. या रस्त्यासाठी भूसंपादन करताना सर्वांना समान न्याय देणे गरजेचे आहे.
तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटार न खोदल्यास रस्ता खराब होणार आहे, याचीही दक्षता घेण्यात यावी. शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्प अपूर्ण असून भुयारी गटार योजनेच्या सर्व्हेक्षणानंतर हा प्रश्न पुढे सरकलेला नाही. भुयारी गटार योजनेमुळे कणकवलीच्या विकासावरही परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी अशुद्ध पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत असून त्याबाबत पत्रक देऊनही नगरपंचायत प्रशासनाने दखल घेतलेली नाही. शिवशक्तीनगर रस्त्यालाही विलंब होत असल्याचे विरोधी नगरसेवकांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)