मराठा समाजासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी : लक्ष्मीकांत पार्सेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 05:40 PM2017-10-24T17:40:13+5:302017-10-24T18:16:45+5:30
मराठा समाजाच्या मागण्यांच्या पाठपुराव्यांसाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मराठा समाज महामोर्चा वर्षपूर्ती संकल्पदिनाच्या निमित्ताने ओरोस येथील शरद कृषी भवन येथे केले.
सिंधुदुर्गनगरी , दि. २४ : मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र सरकारने सकारात्मक पावले उचलली पाहिजेत. मराठा समाजाने आता सुशेगाद न बसता आपल्या समाजाची असणारी एकजूट यापुढेही निरंतर चालू ठेवत उत्तरोत्तर क्रांती घडवावी. मराठा समाजाच्या मागण्यांच्या पाठपुराव्यांसाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मराठा समाज महामोर्चा वर्षपूर्ती संकल्पदिनाच्या निमित्ताने ओरोस येथील शरद कृषी भवन येथे केले.
सिंधुदुर्गात मराठा क्रांती मोर्चाला २३ आॅक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी ओरोस येथील शरद कृषी भवन येथे मराठा मोर्चा संकल्प दिनाचे आयोजन व मराठा सरपंच गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे, युवा नेते विक्रांत सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, गावडे काका महाराज, मराठा फाऊंडेशन अध्यक्ष चैताली गावडे, मराठा समाज समन्वयक अॅड. सुहास सावंत, प्रभाकर सावंत, धीरज परब, भाई सावंत, मुस्लीम समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मुश्ताक शेख, सरपंच, मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी ओरोस नवनिर्वाचित सरपंच प्रिती देसाई यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पार्सेकर म्हणाले, सरकार अॅट्रॉसिटी कायद्याबाबत गंभीर आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावेत. मराठा समाजाच्या एकजुटीचा रेटा असाच कायम राहू देत. या समाजाने राज्यात ५७ मोर्चे काढले. या मोर्चांचे नेतृत्व नारीशक्तीच्या हाती देण्यात आले होते.
ज्यावेळी महिला समाजाच्या पुढे येऊन नेतृत्व स्वीकारतात त्यावेळीच खºया अर्थाने समाजाची प्रगती होते. मराठा समाजाच्या समन्वयांनी या समाजाची धुरा युवकांच्या खांद्यावर देऊन अत्यंत योग्य असे काम केले आहे. ही क्रांती अशीच पुढे तेवत रहावी. मराठी मागण्यांसाठी आपणही शासनाकडे मागणी करू, असे पार्सेकर यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्गात वर्षभरापूर्वी समाजाच्या न्याय हक्कांसाठी मोर्चाच्या माध्यमातून महालाट अवतरली होती. त्या लाटेचा प्रभाव अद्यापही कायम असून त्या लाटेच्या लहरी विविध भागात पसरून आज मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे सरपंच निवडून आले आहेत.
गतवर्षी मराठा मोर्चात सहभागी झालेल्या बांधवांना पाण्याची तसेच नाश्त्याची व्यवस्था करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मुस्लीम समाजाचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सरकारला धारेवर धरू
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीरतेने न घेतल्यास सरकारला धारेवर धरू, प्रसंगी विधानसभा अंगावर घेऊ असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले असे सांगत भविष्यात ते कसे टिकेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही राणे म्हणाले.