वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे निगुडे गाव अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 05:26 PM2019-04-15T17:26:50+5:302019-04-15T17:29:15+5:30
अचानक झालेल्या वादळी अवकाळी पावसाचा फटका निगुडे गावाला बसला. निगुडेत झालेल्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाºयामुळे आंब्याचे झाड कोसळून विजेचे तीन खांब कोसळले
बांदा : अचानक झालेल्या वादळी अवकाळी पावसाचा फटका निगुडे गावाला बसला. निगुडेत झालेल्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाºयामुळे आंब्याचे झाड कोसळून विजेचे तीन खांब कोसळले. त्यामुळे निगुडे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. यामुळे निगुडे गावाला शनिवारी मध्यरात्री १२.३० नंतर अंधारात रहावे लागले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीज वितरणचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने काजू, आंबा, जांभूळ, करवंद, कोकम आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अवकाळी पावसाने काजू पिकावर परिणाम झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. महावितरणच्या तंत्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांनी, ग्रामस्थांनी युद्धपातळीवर काम करीत रविवारी सांयकाळी ६.३० वाजता वीजपुरवठा सुरळीत केला. शनिवारी दुपारपासूनच वातावरणातील उष्म्यात प्रचंड वाढ झाली होती. तसेच सायंकाळी ढगाळ वातावरण होते. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी नुकसान झाले.
निगुडे येथे सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे आंब्याचे झाड कोसळून तीन विजेचे खांब कोसळले व गावातील वीजपुरवठा खंडित झाला. याबाबतची माहिती मिळताच निगुडे ग्रामपंचायत सदस्य प्रताप गावडे, उमेश गावडे, संदीप राणे, नारायण राणे आदींनी सहकार्य केले. निगुडेचे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून वीज अधिकाºयांना कल्पना दिली. एका छतावर वीज खांब पडल्याने सिमेंटच्या पत्र्यांचे नुकसान झाले. सर्व विद्युत तारा रस्त्यावर पडल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता.
विद्युत वितरणला माहिती
दिल्यानंतर विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रविवारी कर्मचारी दाखल झाले.
रविवारी सकाळी घटनास्थळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी येत सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. त्वरित याठिकाणी विद्युत खांब उभारण्यात यावेत अशी तातडीची मागणी करण्यात आली.
सध्या एप्रिल महिना म्हणजे उष्म्याचा काळ सुरू आहे. रस्त्यावर पडलेले आंब्याचे झाड बाजूला करण्यात आले. यावेळी निगुडे ग्रामपंचायत सदस्य प्रताप गावडे, उमेश गावडे, संदीप राणे, पंढरीनाथ राणे, नारायण राणे, दीपक पवार, महेश गावडे यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. यावेळी महावितरणचे वायरमन मयेकर, कुडव तसेच लाईनमन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीचे दीपक निगुडकर आदी उपस्थित होते.
नागरिकांमधून नाराजी
येथील महावितरणचे अभियंता अनिल यादव हे सुटीवर असल्यामुळे तसेच त्यांनी या घटनेकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. याठिकाणी जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण? त्यामुळे शाखा अभियंता यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केली.
वादळी पावसामुळे आंब्याच्या झाडासह विजेचे तीन खांब कोसळून पडल्याने निगुडेतील वीजपुरवठा खंडित झाला होता.