उधाणामुळे पंधरामाड येथील वस्तीला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 01:05 AM2017-07-23T01:05:31+5:302017-07-23T01:05:31+5:30
सतर्कतेच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहरानजीकच्या पंधरामाड-मिऱ्या भागात लाटांचा जोर वाढल्याने येथील वस्तीला धोका निर्माण झाला असून, घरासमोरील रस्ताही खचला आहे. मध्यरात्री तसेच आज, रविवारी पुन्हा मोठ्या लाटांचा मारा सोसावा लागणार असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतील उधाणाच्या लाटांचा मारा येथील किनारपट्टीवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन या भागातील ३४ घरांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून मिऱ्या भागातील नागरिक समुद्राच्या अतिक्रमणाच्या धोक्याला सामोरे जात आहेत.शनिवारी अमावस्येच्या भरतीमुळे समुद्राच्या पाण्याने पंधरामाड भागातील वस्तीत प्रवेश करण्यास सुरुवात केली. लाटांच्या माऱ्यामुळे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या भागातील जगदीश पेजे आणि गोपीनाथ पोपडे यांच्या घरासमोरील रस्त्याला मोठे भगदाड पडून या भागातील माती ढासळली. दुपारी आलेल्या भरतीने या लोकांच्या तोंडचे पाणी पळाले.
१९८८ साली मिरकरवाडा बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम पुढेपर्यंत आणल्याने या भागाला समुद्राच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.
हा भाग नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये येत असल्याने रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी या भागात तातडीने भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक राजेश नागवेकर, पल्लवी पाटील उपस्थित होते. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना पाचारण करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या भागात जेसीबीच्या साहाय्याने तात्पुरत्या स्वरूपात दगडांचा बंधारा टाकण्यात आला आहे. मात्र, शनिवारी दुपारपासून अमावस्येला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे रात्रीपासून रविवारपर्यंत लाटांचा जोर कायम राहणार असल्याने या भागातील लोकांचा जीव टांगणीला लागला आहे.
मिऱ्यावासीयांची ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी या भागाची पाहणी रत्नागिरीचे मंडल अधिकारी तसेच तलाठी यांनी केली.
सतर्कतेच्या सूचना
येत्या आॅगस्ट महिन्यातील ९, १० २१, आणि २४ आॅगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यातील ८ आणि २० रोजी समुद्रात उधाणाच्या लाटा निर्माण होणार आहेत. त्यामुळे या भागातील ३४ घरांना सतर्कतेच्या सूचना तहसील प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.