उन्हाळ्यामुळे शीतपेयांना मागणी
By admin | Published: March 31, 2015 09:18 PM2015-03-31T21:18:52+5:302015-04-01T00:14:47+5:30
ग्राहकांना भुरळ : स्थानिक उत्पादनांच्या विक्रीतही वाढ
प्रथमेश गुरव -वेंगुर्ले -वाढत्या उन्हाळ्यात बाजारात दाखल झालेल्या नावीन्यपूर्ण वेष्टनातील कंपनीच्या व स्थानिक शीतपेयांनी ग्राहकांना भुरळ घातली आहे. कंपनीच्या शीतपेयांबरोबरच स्थानिक शीतपेयांनाही मागणी असल्याचे आढळून आले आहे.
सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. वाढत्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी नागरिक शीतपेये पीत असतात. बाजारात विविध कंपन्यांची शीतपेये दाखल झाली आहेत. नावीन्यपूर्ण वेष्टनातील ही शीतपेये नागरिकांना आकर्षित करीत आहेत. मात्र, दुसरीकडे गावातील स्थानिक लोकही स्वत: शीतपेयांचे उत्पादन घेत असून त्यांचीही उत्पादने बाजारात आली आहेत. कंपनीच्या व स्थानिक उत्पादनांमधील शीतपेये निवडताना गाहक स्थानिक शीतपेयांची निवड करत असल्याचे स्थानिक उत्पादकांचे म्हणणे आहे. दरम्यान, बाहेर गावचे प्रवासी, पर्यटक मात्र ‘यूज अॅण्ड थ्रो’ अशा स्वरुपातील असणारी शीतपेये घेणेच पसंत करतात.
स्थानिक शीतपेयांच्या किंमती या कंपनीच्या शीतपेयांपेक्षा कमी व सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या असतात. परंतु कंपनीची शीतपेये महाग असली, तरी त्यांच्या ‘यूज अॅण्ड थ्रो’ वेष्टनामुळे प्रवासात स्वत:बरोबर ठेवणे सोयीचे बनते. त्यामुळे स्थानिक प्रवासीवर्ग सुद्धा कंपनीच्या शीतपेयांचा वापर करतात. परिणामी, पर्यटक तसेच प्रवाशांपर्यंत आपले उत्पादन पोहोचविण्यासाठी स्थानिक उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत.
वेंगुर्ले तालुक्यात ८ ते १० च्या आसपास स्थानिक शीतपेयांचे तसेच कोकम सरबत बनविणारेही उत्पादक आहेत. शीतपेयांमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे ‘पाणी’. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल, तर उत्पादन घेणे सोयीचे होते. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस न पडल्यास बाजारपेठेतील शीतपेयांची मागणी वाढती राहते. पण पाणी टंचाईचे मोठे संकट या स्थानिक उत्पादकांसमोर निर्माण होते. बाहेरून पाणी आणून उत्पादन करणे परवडणारे नसल्याने मे महिन्याच्या शेवटी हा व्यवसाय मंदगतीने चालतो.
जाहिरात, बाजारपेठ, पाणी या संकटांना सामोरे जात स्थानिक शीतपेये उत्पादकांना हा व्यवसाय टिकविणे म्हणजे एक प्रकारचे आव्हानच असते. (प्रतिनिधी)
स्थानिक उत्पादकांना प्रतिसाद
सध्या स्पर्धेचे युग असल्याने प्रत्येक व्यवसायात स्पर्धा ही आहेच. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी काही स्थानिक थंड पेय उत्पादकांनी कंपनीशी बरोबरी करत प्लास्टिक बॉटलमध्ये उत्पादन सुरू केले आहे. त्याला प्रतिसादही लाभत आहे. मात्र, प्लास्टिक बॉटलमधील ही प्रक्रिया महागडी असल्याने यामध्ये चांगले यश मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
- दीपक माडकर, रेलीश सोडा फॅक्टरी वेंगुर्ले
दर्जा वाढविल्यास बाजारपेठ
आमच्याकडे स्थानिक व कंपनीची अशी दोन्ही उत्पादने विक्रीस आहेत. पर्यटकांकडून कंपनीच्या उत्पादनांची मागणी जास्त असते. स्थानिक थंडपेय उत्पादकांनी आपल्या उत्पादनाचा दर्जा वाढविल्यास निश्चितच त्यांना चांगल्याप्रकारे बाजारपेठ मिळू शकेल. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. परंतु हे तंत्रज्ञान आर्थिकदृष्ट्या स्थानिक उत्पादकांना परवडणारे नाही.
- संजू तानावडे भाजप शहराध्यक्ष