खराब हवामानामुळे चिपी विमान तळावरून मुंबईला जाणारे विमान रद्द, चाकरमान्यांची नाराजी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 1, 2022 05:10 PM2022-09-01T17:10:43+5:302022-09-01T17:11:17+5:30
विमानतळावर कॅन्टीन नसल्यामुळे सर्वच प्रवाशांचे मोठे हाल
खारेपाटण (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिह्यातील चिपी विमान तळावरून मुंबईला जाणारे काल, बुधवार ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०० वाजताचे विमान खराब हवामान असल्याचे कारण सांगून अचानक रद्द करण्यात आले. या विमानाने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. याबाबत खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी विमान सेवेच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
चिपी विमानतळावरून मुंबईला जाणारे विमान अचानक रद्द करण्यात आल्याने जेष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांना खाण्यापिण्यासाठी वणवा करावी लागली. या विमानतळावर कॅन्टीन नसल्यामुळे सर्वच प्रवाशांचे मोठे हाल झाले. काही प्रवासी दुपारी दोन वाजल्यापासून विमानतळावर येऊन थांबले होते. विमानतळावर साधी अल्पोपहाराची देखील व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे खाण्यापिण्याचे हाल तर झालेच.
परंतु दर दहा मिनिटांनी दहा मिनिटे थांबा असे वेटिंगवर ठेऊन सायंकाळी साडेसहा वाजता विमान रद्द झाले असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. अचानक विमान रद्द झाल्याचे समजताच लांबून आलेल्या प्रवाशांना माघारी जावे लागले. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या विमानामध्ये खारेपाटण, तरेळे ,वैभववाडी, सावंतवाडी, मालवण या सर्व तालुक्यातील प्रवासी प्रवास करणार होते. पण त्यांनी या विमान प्रवाहाच्या सेवेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
विमानतळ प्रशासनाचा गलथाण कारभार
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तरी किमान सिंधुदुर्ग जिह्यातील चिपी विमानतळावर प्रवाशासाठी अत्यावश्यक सुविधा प्रशासनाने पुरविल्या पाहिजे होत्या. मात्र सद्या इथे कोणत्याही सोयी सुविधा नसल्याने हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर इमर्जन्सी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ताटकळत ठेऊन अचानक फ्लाईट रद्द झाल्याचे सांगण्यात येऊन प्रवासी वर्गाला नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने हवाई प्राधिकरणाने आपल्या गलथाण कारभारात सुधारणा करावी. - रफिक नाईक, सामाजिक कार्यकर्ते,खारेपाटण