सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाऊस हटेना; शेतात चिखल, कापणी करायची कशी?, भात उत्पादनावर होणार परिणाम
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 1, 2024 12:16 PM2024-11-01T12:16:14+5:302024-11-01T12:16:38+5:30
सुगी तोंडावर अन् परतीचा पाऊस मुळावर
महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : परतीच्या पावसाचे ढग जिल्ह्यातून हटण्याचे नावच घेत नाहीत. गेले आठ ते दहा दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने भाताच्या शेतात चिखल झाला आहे. पाणी साचून राहिल्याने काढणीला आलेले पीक काढणीविना वाया जात आहे.
ऑक्टोबर महिन्याचा गुरूवार ३१ हा शेवटचा दिवस संपला तरी पाऊस काही जाण्याची चिन्हे दिसत नाहीत. दररोज सायंकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे कापणीला आलेले भातपीक शेतात आडवे झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ही स्थिती आहे. विविध भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
बळीराजा चिंताग्रस्त
जिल्ह्यात ५५ ते ६० हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतीला बहर आला आहे. पाऊस उत्तम झाल्याने भातपीक चांगले भरून आले आहे. त्यामुळे यंदा भाताचे उत्पादनवाढीची शक्यता होती. मात्र, परतीच्या पावसात भाताची नासाडी होत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
तयार झालेल्या भातपीकाची दैना
गेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने विविध ठिकाणी थैमान घातले आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सायंकाळी विजांचा आणि ढगांचा गडगडाट होत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाहले आहे. नवरात्री उत्सवादरम्यान किवा दसऱ्यानंतर शेतकरी शक्यतो तयार झालेले पीक कापण्यास सुरूवात करतात. मात्र, पाऊस लांबल्याने तयार झालेल्या भाताची दैना झाली असून आता त्यापैकी घरात किती येणार हा प्रश्नच आहे.
नुकसान भरपाई द्यावी
- ऐन दिवाळीत बळीराजाची दिवाळी शेतात तर मोत्याचे धान चिखलात लोळत असल्याने बळीराजा चिंतेत आहे. त्यामुळे शासनाने सरसकट नुकसानभरपाई जाहीर करून ती द्यावी, अशी मागणी होत आहे.
- जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत चार हजार मिलीमीटरच टप्पा गाठला असून ही गेल्या चार वर्षातील विक्रमी नोंद आहे.
- आता परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. शेत लागवडीसाठी खर्च केलेले पैसेसुद्धा पदरात पडणार की नाही. या विवंचनेत येथील शेतकरी आहे.
भातशेतीचे पंचनामे करा
- सतत पडणार्या पावसाने पिकलेले भातपीक आडवे झाले आहे. परतीच्या पावसाने भातशेती धोक्यात आली आहे.
- भाताचे पीक कुजण्याची शक्यता आहे. पंचनामा करून भात पिकाची नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे.
- सर्व शासकीय यंत्रणा सध्या निवडणुकीच्या कामात मग्न आहे. त्यामुळे त्यातून काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळ काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे.
यंदा सुरूवातीपासून चांगला पाऊस पडल्याने भातपीक चांगले आले होते. दिवाळीपर्यंत सुगीचा हंगाम सुरू होईल, असा विश्वास होता. मात्र, परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. काही शेतकर्यांचे भात अक्षरश: शेतात झोपले आहे. पीक कुजण्याचे तसेच भाताच्या दाण्यांना मोड येऊन भातपिकाचे नुकसान झाले असून शासनाने सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गाची आहे. - शशिकांत सरनाईक, शेतकरी, माळगाव, मालवण.
माणगाव खोऱ्यात बहुतांश भातशेती कापणीसाठी सज्ज आहे. असे असताना पावसाने धिंगाणा घातला आहे. कापणीच्या हंगामास पावसामुळे विलंब झाला असून परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. पूर्ण भातपीक पाण्यात आहे. त्यामुळे आमचा नाईलाज झाला आहे. - गुरूनाथ पालकर, शेतकरी, माणगाव