सिंधुदुर्ग : वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या, सामूहिक रजा आंदोलनामुळे जीएसटी कार्यालय ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 10:22 AM2018-01-06T10:22:26+5:302018-01-06T10:32:44+5:30
वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे विविध मार्गाने आंदोलने करूनही शासनाने दुर्लक्ष केले. मागण्या मान्य न झाल्याने या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील वस्तू व सेवा कार्यालयात शुकशुकाट होता.
ओरोस : वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे विविध मार्गाने आंदोलने करूनही शासनाने दुर्लक्ष केले. मागण्या मान्य न झाल्याने या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील वस्तू व सेवा कार्यालयात शुकशुकाट होता.
४ व ५ जानेवारी या कालावधीत रजा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस. व्ही. घाडीगावकर यांनी दिला. त्यानुसार हे आंदोलन सुरू झाले असून गुरुवारी कार्यालयात कोणीही कर्मचारी, अधिकारी उपस्थित नव्हते. परिणामी जिल्हाभरातून कामानिमित्त दाखल झालेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने मागे परतावे लागले.
वस्तू व सेवा कर विभागातील गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरावीत, वेतन त्रुटीचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत, सेवा भरती नियमांमध्ये बदल करताना संघटनांना विश्वासात घ्यावे, वस्तू व सेवा कर विभागात केंद्राच्या धर्तीवर समान काम, समान पदे व समान वेतन ही त्रिसूत्री लागू करावी, विभागातील संवर्ग वाटप व संरचना अधिनियमामधून राज्यकर विभागास कायमस्वरूपी सूट द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे.
मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे सामूहिक रजा आंदोलन छेडीत आहेत. यापूर्वी ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी काम केले होते.