लाकडी साकव तुटल्याने महिला पडली नदीपात्रात

By admin | Published: April 12, 2015 10:23 PM2015-04-12T22:23:20+5:302015-04-13T00:06:20+5:30

आरोसबाग येथील घटना : होडीचालकाकडून महिलेला जीवदान

Due to wooden breaks, women fell into river bed | लाकडी साकव तुटल्याने महिला पडली नदीपात्रात

लाकडी साकव तुटल्याने महिला पडली नदीपात्रात

Next

बांदा : बांदा- आरोसबाग तेरेखाल नदीपात्रावर आरोसबागवासीयांनी श्रमदानाने बांधलेला लाकडी साकव आज रविवारी सकाळी मधोमध तुटून पडल्याने साकवावरुन प्रवास करणाऱ्या समिधा सहदेव चांदेकर या नदीत कोसळल्या. तेथीलच होडीचालक संतोष तारी यांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना नदीपात्रातून बाहेर काढले. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
आरोसबागवासीयांची गेली कित्येक वर्षांची नदीपात्रावर पूल बांधण्याची मागणी धूळखात पडल्याने आरोसबाग ग्रामस्थ दरवर्षी डिसेंबर अखेर श्रमदानाने लाकडी साकव उभारतात. पावसाळ्यापर्यंत बांद्यात येण्यासाठी आरोसबागवासीय या साकवाचा वापर करतात. दोन महिन्यांपूर्वी या साकवावर नदीतिरालगतचा माड कोसळल्याने साकव मोडकळीस आला होता. मात्र, ग्रामस्थांनी तातडीने दुरुस्ती करुन साकव पूर्ववत केला होता.आज सकाळी नेहमीप्रमाणे आरोसबागवासीय बांद्यात येण्यासाठी या साकवावरुन प्रवास करत होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सुविधा चांदेकर या साकवावरुन प्रवास करत असताना साकव नदीपात्रात मधोमध तुटून पडला. अचानक साकव कोसळल्याने चांदेकर या नदीपात्रात फेकल्या गेल्या. नदीच्या पाण्यात गटांगळ्या खावू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केली. आरोसबाग नदीतिरावर असलेले होडीचालक संतोष तारी यांनी प्रसंगावधान दाखवत लागलीच नदीपात्रात धाव घेत समिधा चांदेकर यांना नदीपात्राबाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आरोसबागवाडीची लोकसंख्या हजाराच्या आसपास आहे. आरोसबागमधून बांद्यात येण्यासाठी तेरेखोल नदीपात्रातून होडीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो. यासाठी ग्रामस्थ या नदीपात्रावर दरवर्षी श्रमदानाने लाकडी साकव बांधतात. सकाळच्यावेळी बांदा तसेच गोव्यात कामासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या देखिल अधिक असते. मात्र, आज सुट्टी असल्याने साकवावर वर्दळ कमी होती. इतर दिवशी साकव कोसळला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. साकव कोसळल्यानंतर आरोसबाग ग्रामस्थांनी याठिकाणी धाव घेत कोसळलेला भाग नदीपात्रातून बाजूला केला.
आरोसबागवासीय या साकवाची उद्या सोमवारपासून दुरुस्ती करणार आहेत. त्यानंतर पुन्हा हा साकव वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Due to wooden breaks, women fell into river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.