अनामतच्या कमिशनवर डल्ला
By admin | Published: October 6, 2015 10:41 PM2015-10-06T22:41:51+5:302015-10-06T23:42:40+5:30
तिलारी प्रकल्पातील प्रकार : ठेकेदार धास्तावले, पाटबंधारे मंत्र्यांकडे तक्रार
सावंतवाडी : तिलारी पाटबंधारे प्रकल्पाची सर्व कामे गेली दोन वर्षे ठप्प असल्याने तसेच शासनाने निधीच न दिल्याने ठेकेदारांनी आपली अनामत रक्कमच काढून घेण्याचा निर्णय घेतला खरा; मात्र, या अनामत रकमेच्या कमिशनसाठी अधिकारी तगादा लावत थेट डल्ला मारत असल्याने ठेकेदाराची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. याबाबत काही ठेकेदारांनी थेट पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे.तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा विभागाची कामे गेली दोन वर्षे बंद आहेत. शासनाकडून ठेकेदारांना कामाचे तब्बल १२ कोटी रूपये येणे आहे. मात्र, यातील शासनाने फक्त ४३ लाख रूपये दिले असून, उर्वरित रक्कम अद्यापपर्यंत दिलेली नाही. अनेकवेळा ठेकेदार संघटनांनी पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे दाद मागितली. पण अद्यापपर्यंत पैसे देण्यात आलेले नाहीत. तिलारी हा आंतरराज्य प्रकल्प असल्याने महाराष्ट्र सरकार गोव्याकडे बोट दाखवत असून, गोवा सरकार महाराष्ट्रकडे बोट दाखवत आहे. गोव्याकडून महाराष्ट्र सरकारला ५४ कोटी रूपये येणे असून, तेही पैसे अद्यापपर्यंत दिले गेलेले नाहीत.शासनाकडून केलेल्या कामांचे पैसे मिळत नसतील, तर आमची अनामत रक्कम परत द्या, असे म्हणत १५ ठेकेदारांनी आपली अनामत रक्कम कालवा विभागातून काढून घेतली. तब्बल २५ ते ३० लाखांची ही रक्कम आहे. मात्र, ही रक्कम घेणाऱ्या ठेकेदारांना वेगळ््याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या अनामत रक्कमेवरही अधिकाऱ्याने कमिशनचा डल्ला मारल्याने अनेक ठेकेदार चांगलेच हवालदिल झाले आहेत. अन्य ठेकेदारांनी अनामत रक्कमेसाठी अर्ज केला आहे.कारण ही अनामत रक्कम प्रत्येक ठेकेदाराला काम घेण्यापूर्वी कार्यालयाला जमा करावयाची असते आणि काम संपल्यावर ती काढून घ्यायची असते. याच रक्कमेच्या कमिशनवर अधिकाऱ्याने डल्ला मारण्यास सुरूवात केल्याने ठेकेदारांनी याबाबत थेट पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यातच तिलारी धरणाचे काम पूर्ण झाले असले तरी कालवा विभागाची कामे अद्याप अपूर्ण आहेत. पूर्वीचे पैसे द्या अन्यथा पुढील कामे करणार नाही, असा पवित्रा ठेकेदारांनी घेतल्याने तिलारी प्रकल्प सध्या ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
मंत्री, अधिकाऱ्यांना ठेकेदार भेटतात
याबाबत तिलारी प्रकल्पाचे ठेकेदार राजन म्हापसेकर यांना विचारले असता ते म्हणाले, ठेकेदार हे नेहमीच अधिकारी व मंत्री यांना भेटत असतात. त्यामुळे कोणी तक्रार केली याची मला माहिती नाही. मात्र, असा प्रकार घडला असेल तर तक्रार केल्याचेही नाकारता येत नाही, असे म्हापसेकर यांनी स्पष्ट केले.
तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा विभागाची कामे गेली दोन वर्षे बंद.
शासनाकडून ठेकेदारांना कामाचे तब्बल १२ कोटी रूपये येणे.
शासनाने फक्त ४३ लाख रूपये दिले.
महाराष्ट्र सरकार दाखवतेय गोव्याकडे बोट.
अनेक ठेकेदार झाले आहेत हवालदिल.