रत्नागिरीत दुमदुमतोय शिमगोत्सव
By admin | Published: March 11, 2017 12:01 AM2017-03-11T00:01:15+5:302017-03-11T00:01:15+5:30
ढोल - ताशांचा गजर : भद्रे शिमगोत्सव उद्या; गावोगावी नाचणाऱ्या पालख्यांमुळे उत्साह
रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. काही गावांमधून तेरसे शिमग्याला प्रारंभ झाला आहे. तर भद्रे शिमगे रविवारपासून साजरे करण्यात येणार आहेत. शहराच्या आसपासच्या गावांतील पालख्या बारावाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरीला भेटावयास येत असल्यामुळे शहरात ढोल-ताशांच्या गजर ऐकावयास मिळत असून, पालख्यांमुळे शिमगोत्सवाचे उत्साही वातावरण तयार झाले आहे.
फाकपंचमीनंतर ग्रामदेवतांना रूपे लावली जातात. त्यानंतर पालख्या बाहेर पडतात. या पालख्या शहरात श्री भैरीबुवाच्या भेटीला येतात. त्यानंतर त्या आपापल्या गावी शिमगोत्सवासाठी परततात. जवळपासच्या गावातील अनेक पालख्या पायी तर काही पालख्या टेम्पो अथवा ट्रकमधून येतात. जयस्तंभपासून पालख्या मंदिरापर्यंत पायी नेल्या जात असल्याने सध्या शहरात वाहतुकीची कोंडीदेखील होत आहे. दि. १२ मार्चपर्यंत शहरात विविध पालख्या येणार असल्यामुळे श्री भैरी देवस्थानतर्फे त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
गावोगावी साजरा होणारा शिमगोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)
बच्चे कंपनीच्या पालख्या
शिमगोत्सवामुळे बच्चेकंपनी देखील छोट्या पालख्या परिसरातील घरोघरी घेऊन जात आहेत. पुठ्ठ्याच्या पालख्यांमध्ये देवीचा फोटो ठेवून ढोल-ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढत आहेत. सध्या परीक्षांचा हंगाम असला, तरी सुटीच्या दिवसात पालख्या नाचविण्यात येत आहेत.
नमन व बहुरूपी
शिमगोत्सवात गावोगावी नमन अथवा खेळे, संकासूर घरोघरी येत आहेत. काही मिनिटांचा खेळ सादर करून ओवाळणी गोळा केली जाते. शिमगोत्सवात बहुरूपीदेखील पोलिसांच्या वेशभूषेत येऊन बिदागी गोळा करीत आहेत.
शिमगोत्सवासाठी मुंबईकरांचे आगमन
तेरसे शिमगोत्सवास सुरूवात झाल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई व अन्य शहरात स्थायिक असलेली मंडळी गावी परतली आहेत. ग्रामदेवतेची पालखी घरी येत असल्यामुळे महिलंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देवीची पूजा, ओटी भरण्यासाठी महिला गावी आल्या आहेत. दुसरा शनिवार, रविवार व होळीची जोडून सुटी आल्याने अनेक मंडळी आणखी रजा घेऊन गावी आली आहेत. काही गावांमधून शिमगोत्सवानंतर सार्वजनिक पूजा, उत्सव साजरे करण्यात येत असल्याने सध्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या काळामुळे विद्यार्थी मात्र हिरमुसले आहेत.