चुकीच्या यादीमुळे रखडले वितरण

By Admin | Published: October 25, 2015 11:46 PM2015-10-25T23:46:55+5:302015-10-25T23:55:16+5:30

रत्नागिरी तालुका : अडीच कोटी नुकसानभरपाईचे वाटप

Dump distribution due to incorrect listing | चुकीच्या यादीमुळे रखडले वितरण

चुकीच्या यादीमुळे रखडले वितरण

googlenewsNext

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने फळपिकासाठी नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील तलाठ्यांनी चुकीची यादी दिल्यामुळे काही गावांना अद्याप नुकसान भरपाई वितरीत करण्यात आलेली नाही. तालुक्यातील १३ हजार ६२ खातेदारांपैकी ४ हजार ३२ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळाला आहे.
जिल्ह्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे आंबापीक असून, जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबापिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी-मार्च मध्ये सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर पावसाचा परिणाम झाल्याने ७२.६३ टक्के नुकसान झाले होते. सतत दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे फुलोरा धुवून निघाला. शिवाय ज्या फुलोऱ्याला कणी ते सुपारीएवढी फळधारणा झाली होती, त्या फुलोऱ्यामध्ये पाणी साचून कुजण्याबरोबर फळे गळून पडली. शिवाय जो आंबा मोठा होता त्या आंब्यावर काळे डाग पडले होते.
जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आल्याने काजूचे ६१.२० टक्के पिकाचे नुकसान झाले. शासनाने शेतकरीनिहाय पंचनामा करण्याचे आदेश देऊन त्यासाठी ग्रामसेवक, कृषी सेवक व कृषी अधिकारी यांच्या त्रिस्तरीय समिती स्थापन केली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ हजार ८६४ शेतकऱ्यांसाठी ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली होती. मात्र, वितरण प्रक्रिया अद्याप संथगतीने सुरू आहे.
रत्नागिरी तालुक्यातील १३ हजार ६२ शेतकऱ्यांसाठी १६ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर झाली आहे. पैकी १६३९ शेतकऱ्यांना २ कोटी ६८ लाख २७ हजार ९०२ रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले आहेत. १६३९ शेतकरी सिंगल खातेदार आहेत, तर २३९३ सामाईक खातेदारांना ७९ लाख ७० हजारांचे धनादेश वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून सातबारा व बँकेचा खाते नंबर घेण्यात आला होता. मात्र, खाते नंबर चुकल्यामुळे ६२ लाख ८१ हजार २६३ रुपयांचे धनादेश परत आले आहेत. त्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांकडून खाते नंबर घेणे सुरू आहे.
काही गावातील शेतकऱ्यांची यादी तलाठ्यांनी अद्याप दिली नसल्यामुळे तेथील आंबा नुकसान भरपाई वितरणाचे धनादेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामध्ये नेवरे गावाचा समावेश आहे. तहसील कार्यालयाकडे चौकशी केली असता, तलाठी रजेवर असल्यामुळे शेतकऱ्यांची यादी देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. तलाठी रजेवरून आल्यावर यादी मिळाल्यानंतर धनादेश काढण्यात येतील, असेही सांगण्यात आले.
आंबा पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्हा आंबा उत्पादक संघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाकडून तुटपंूजी नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. मात्र, कर्मचारीवर्गाच्या दिरंगाईमुळे आॅक्टोबर संपला तरी नुकसान भरपाई मिळालेली नाही. रत्नागिरी तालुक्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत अतिशय संथगतीने वितरणाचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)


बेफिकीर तलाठी : काही गावांत भरपाई नाही
आधीच सातबारा उताऱ्यावर अनेकांची नावे असल्यामुळे नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामध्ये आता तलाठ्यांच्या चुकीचाही फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Dump distribution due to incorrect listing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.